बॉलिवूडमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीला चतुरस्र अभिनेता म्हणून ओळखले जाते. कोणतीही भूमिका सहजपणे निभावणाऱ्या या अभिनेत्याने आजवर अनेक पुरस्कार मिळवले आहेत. पण, यावेळेस नवाजला पुरस्कार मिळाला नसून त्याच्या आईचा सन्मान झाला आहे. स्वतः नवाजनेच हे वृत्त सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांना दिले.
नुकतीच ‘बीबीसी’ने १०० प्रभावशाली महिलांची यादी जाहीर केली. या यादीत नवाजुद्दीनची आई महरूनिसा सिद्दीकी यांच्या नावाचाही समावेश आहे. आपल्या आईसोबतचा कृष्णधवल फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी त्याने दिली. त्याने फोटोसह लिहिलंय की, एका छोट्याशा गावातील रितीरिवांजाचे पालन करणाऱ्या कुटुंबामधून आलेली आणि समोर आलेल्या प्रत्येक संकटाला स्वतः सामोरं जात इतरांना पाठबळ देणारी माझी आई. आपल्या आईच्या या यशाने बॉलिवूडचा ‘बाबुमोशाय बंदूकबाज’ खूपच खूश आहे.
A Lady who showed courage against all odds being in a conservative Family from a small village-My Mother #100MostInfluentialWomenInTheWorld pic.twitter.com/rtE9VnEP74
— Nawazuddin Siddiqui (@Nawazuddin_S) September 27, 2017
‘बीबीसी’ने जाहिर केलेल्या या यादीत भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिचाही समावेश आहे. महिलांच्या अधिकारांसाठी झगडणाऱ्या कार्यकर्त्या डॉ. उर्वशी सहानी, बिजनेस वुमेन अदिती अवस्थी, शिक्षिका आणि सामाजिक कार्यकर्त्या तुलिका किरन आणि १६ वर्षीय भारतीय विद्यार्थिनी प्रियांका रॉय यांच्याही नावांचा समावेश आहे.