आयुर्वेदाने दिला अफगाणिस्तानमधील महिलेला पुनर्जन्म

आयुर्वेदाने दिला अफगाणिस्तानमधील महिलेला पुनर्जन्म | ayurved treatment saved afgan women life

अफगाणिस्तानमधील शम्सा (24) या महिलेला आयुर्वेदातील 2500 वर्षापूर्वीच्या ‘सुश्रुत’ तंत्रामुळे पुनर्जन्म मिळाला आहे. 4 वर्षापूर्वी दहशतवादी हल्ल्यात तिच्या नाकाला गोळी लागली होती. यात सुदैवाने तिचा जीव तर वाचला पण तिच्या नाकाला मात्र गंभीर दुखापत झाली. यामुळे तिला श्वास घेणे जमत नव्हते. शस्माचे नाक ठिक करणे हे तेथील डॉक्टरांसाठी मोठे आव्हान होते. तिथे तिच्या नाकावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. पण त्यात डॉक्टरांना यश आले नाही. पण अफगाणिस्तानच्या डॉक्टरांना जे जमले नाही ते हिंदुस्थानमधील डॉक्टरांनी करून दाखवले. त्यांनी सुश्रुत या तंत्राचा वापर करून तिला दुसरे कृत्रिम नाक बसवले. यामुळे आपल्याला दुसरा जन्म मिळाल्याचे शस्माने म्हटले आहे.

शस्मावर दिल्लीतील केएएस मेडिकल सेंटर अॅण्ड मेडस्पा या रुग्णालयात उपचार सुरू होते. शस्मावरील शस्त्रक्रिया गुंतागुंतीची होती. अत्याधुनिक वैद्यकिय तंत्राचा वापर करूनही काहीच उपयोग होत नव्हता. अत्याधुनिक प्लास्टिक सर्जरीचे तंत्र हे पुरातन सुश्रुत तंत्रावरच आधारित आहे. यामुळे सुश्रुतचे तंत्र वापरून शस्माचे नाक तयार करण्यात आले. त्यासाठी तिच्या गालाच्या त्वचेचा वापर करण्यात आला, असे प्लास्टीक सर्जन डॉ. अजय कश्यप यांनी सांगितले आहे.

शस्माने हिंदु्स्थानी डॉक्टरांचे आभार मानले आहेत. आमच्या देशात गोळीबार करणे ही सामान्य गोष्ट आहे. यात अनेकजण मृत्यूमुखी पडतात. तर काहीजणांना अपंगत्व येते. यामुळे त्यांचे आयुष्यच बदलते. शरीराचा एक अवयवही निकामी झाला तर जगणंच भीतीदायक वाटू लागत. पण मी आता खूप आनंदात आहे कारण मी आता सामान्य आयुष्य जगू शकते. आता मी नव्याने जगणार आहे. माझ्या देशात गेल्यावर मी येथील डॉक्टरांबद्दलही सगळ्यांना सांगणार असल्याचं शस्माने म्हटलं आहे.

दरम्यान, सुश्रुत संहितेत एकूण 184 अध्याय आहेत. यात 1120 रोगांवरील उपचारासाठी 8 आवश्यक शस्त्रक्रियांबद्दल सांगण्यात आलं आहे. नाक आणि गळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी सुश्रुतमधील दोन तंत्र आजच्या अत्याधुनिक वैद्यकीय उपचारात वापरले जातात. त्यातील एका तंत्रावर आधारित शस्त्रक्रिया शस्मावर करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here