वजन घटविण्यासाठी अनेक जण धावण्यासारख्या ‘हाय इंटेन्सिटी’, म्हणजेच ज्यामध्ये जास्त श्रम घ्यावे लागतील अश्या व्यायामप्रकारची निवड करताना दिसतात. धावणे हा व्यायामप्रकार निवडल्याने वजन घटतेच, पण त्याहूनही महत्वाचे म्हणजे घटलेले वजन परत वाढत नाही. किंबहुना याच कारणास्तव अनेक जण वजन घटविण्यासाठी धावण्याचा पर्याय निवडताना दिसतात. पण क्वचित प्रसंगी धावण्यासारखा व्यायम निवडून आणि त्याला पूरक आहाराची जोड देऊनही वजन अपेक्षेप्रमाणे घटत नाही, आणि घटले तर लवकरच परत वाढू लागते. जर असे होत असेल, तर यासाठी काही गोष्टी विचारात घेण्याची आवश्यकता आहे.
धावणे, आणि त्याला पूरक इतर व्यायामप्रकार आणि योग्य आहाराचा अवलंब केल्याने सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये वजन झपाट्याने घटते. व्यायाम आणि आहार यांच्या द्वारे आपल्या जीवनशैलीमध्ये केलेल्या बदलांचा परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतो. आपल्या शरीरामध्ये चरबीचे प्रमाण घटून ‘मसल मास’ (muscle mass) वाढू लागतो. विशेषतः ज्या स्नायूंचा उपयोग धावण्यासाठी केला जातो, त्या स्नायूंना अधिक बळकटी येऊ लागते, आणि त्यांचा ‘मसल मास’ वाढू लागतो. पण ज्या वेगाने मसल मास वाढू लागतो, त्याच्यापेक्षा जास्त वेगाने जर शरीरातील चरबी घटली नाही, तर वजन घटणे अवघड होते. यावर करण्याचा उपाय एकच, आणि तो म्हणजे धीर न सोडता प्रयत्न करीत राहणे. कालांतराने चरबी घटणे सुरू होऊन वजन घटण्यास सुरुवात होते.
धावण्याच्या व्यायामासोबत आहारावर नियंत्रण ठेवणे आणि व्यायामास पूरक आहार घेणे आवश्यक असते. अनेकदा आपण धावण्यामध्ये किती उर्जा खर्च केली याचा योग्य अंदाज आपल्याला घेता येत नाही, आणि त्याचबरोबर आपण घेत असलेल्या आहारामधून नेमकी किती उर्जा आपल्याला मिळते आहे याचा ही अचूक अंदाज आपल्याला नसतो. त्यामुळे खर्च झालेल्या कॅलरीजच्या मानाने खाल्ल्या जाणाऱ्या कॅलरीज अधिक असतात. आणि याच कारणामुळे वजन घटण्यामध्ये अडचण उत्पन्न होत असते. यावर उपाय असा, की आपला दिनक्रम आणि व्यायाम लक्षात घेऊन आपल्याला किती कॅलरीजची आवश्यकता आहे हे पाहावे. यासाठी तज्ञांची मदत घेतली जाऊ शकते, तसेच आजकाल मोबाईल फोनवर अनेक अॅप्स उपलब्ध आहेत. या अॅप्स द्वारे आपल्याला आवश्यक तितक्या कॅलरीजच आपल्या आहारामध्ये असतील याची खबरदारी घेणे सोपे होते.
अनेक जण धावण्याच्या व्यायामाचा अतिरेक करतानाही दिसतात. यामुळे शरीराला आवश्यक तेवढी विश्रांती मिळू शकत नाही, तसेच शरीरातील पाणी, इलेक्ट्रोलाईट्स, ब्लड शुगर, आणि शारीरिक तणावाच्या पातळ्यांमध्ये असंतुलन निर्माण होते. याचा परिणाम थायरॉइड ग्रंथीच्या कार्यावर आणि शरीराच्या चयापचय शक्तीवरही होत असतो. त्यामुळे वजन घटविण्याच्या प्रयत्नांमध्ये अडथळा येऊ शकतो. यावर उपाय हा, की धावल्यानंतर शरीराला आवश्यक ती विश्रांती देणे आवश्यक आहे. त्याच्या जोडीने शरीराच्या स्नायूंना ताकद मिळेल अश्या पूरक आहाराच्या अंतर्गत संपूर्णपणे नैसर्गिक अन्नपदार्थ सेवन केले जाणे ही आवश्यक आहे. त्याचबरोबर सात ते आठ तासांची झोप आवश्यक आहे. धावण्याच्या व्यायामातून शरीराला झालेल्या श्रमांसाठी ‘रिकव्हरी रन्स’ योजावेत. तसेच मानसिक तणाव कमी असेल याची काळजी घ्यावी.