पुणे – विवाह नोंदणीसाठी आवश्यक नोंदणी, शुल्क भरणा, अर्ज भरणे, विवाहाची तारीख आणि नोटिसा पाठविण्याची प्रक्रिया सध्या ‘ऑफलाइन’ पद्धतीने केली जात आहे. या क्लिष्ट आणि वेळखाऊ प्रक्रियेमध्ये मध्यस्थांकरवी आर्थिक लूट केल्याच्या असंख्य तक्रारी नागरिकांकडून केल्या जात होत्या. त्यावर आता ऑनलाइन तोडगा निघाला आहे. यापुढे विवाह नोंदणी, नोटिसा आणि प्रमाणपत्र ‘ऑनलाइन’ मिळणार आहे.
‘‘राज्य नोंदणी व मुद्रांक शुल्क संचालनालयाकडून यासाठी स्वतंत्र संगणकीकृत प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्याद्वारे आता विवाह नोंदणी, अर्ज भरणे, शुल्क भरणे, नोटिसा आणि प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने मिळू शकणार आहे. त्याची सराव चाचणी पूर्ण झाली असून येत्या काही दिवसांत ही प्रणाली पूर्णतः कार्यान्वित केली जाईल,’’ अशी माहिती राज्य नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे महानिरीक्षक अनिल कवडे यांनी दिली.
अवश्य वाचा – स्टॅंप ड्यूटी जेवढ्यास-तेवढी, ‘स्टॅंप ड्यूटी कॅलक्युलेटर’ सुविधा लवकरच उपलब्ध
राज्यभरातील जिल्हानिहाय विवाह नोंदणी कार्यालयांमध्ये सध्या ऑफलाइन पद्धतीने विवाह नोंदणी अर्ज भरणे, शुल्क भरणे, नोटिसा स्वीकारणे आणि प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया क्लिष्ट आणि वेळखाऊ असल्याने नागरिकांना चार ते पाच वेळा हेलपाटे मारावे लागत होते. याचा गैरफायदा घेत काही वकील आणि मध्यस्थ एजंटांकरवी आर्थिक लूट केली जात होती. त्यावर ‘ऑनलाइन’ तोडगा काढल्यामुळे नागरिकांना घरबसल्या विवाह नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया करता येईल. यामुळे नोंदणी कार्यालये ‘पेपरलेस’ तसेच ‘एजंट फ्री’ होणार आहेत.