Skip to content Skip to footer

डेंगी चा आजपासून नायनाट

पुणे – शहरात उद्रेक झालेला डेंगी नियंत्रणात आणण्यासाठी आता घरोघरी जाऊन डासांचा नायनाट करण्यात येणार आहे. या मोहिमेची अंमलबजावणी मंगळवार (ता. २२) पासून होणार आहे. त्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयनिहाय डास सर्वेक्षण पथक स्थापन केले असून, त्याअंतर्गत रोज २०० घरांची पाहणी करण्यात येणार आहे. पुढील १६ दिवसांमध्ये दोन वेळा हे पथक घरोघरी जाणार असून डास उत्पत्तीच्या ठिकाणी औषध फवारणी केली जाणार आहे. पहिल्या वेळी भेट दिल्यानंतर हिरव्या, तर दुसऱ्यावेळी निळ्या रंगाची खूण करण्याच्या सूचना पथकांना दिल्या आहेत.

शहर आणि परिसरात गेल्या १५ दिवसांपासून उघडीप घेतलेल्या पावसाला शनिवारपासून पुन्हा सुरवात झाली आहे. ठिकठिकाणी साचलेल्या पावसाच्या पाण्यात डासांची पैदास होते. त्यातून डेंगीचा उद्रेक होतो. हा उद्रेक रोखण्यासाठी आता ठोस पावले न उचलल्यास येत्या दोन महिन्यांमध्ये शहरात डेंगीच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढण्याचा धोका आहे. त्यासाठी प्रत्येक घरात जाऊन डास उत्पत्तीची ठिकाणे शोधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्वतंत्र बैठक घेऊन कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

अवश्य वाचा – गणपती उत्सव – चिनी वस्तूंकडे पुणेकरांनी फिरवली पाठ

अशी राबविणार मोहीम
या मोहिमेसाठी महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांतील कीटक प्रतिबंध विभागातील ४० कर्मचारी नियुक्त केले आहेत. हे पथक रोज २०० घरांची पाहणी करून घरातील डास उत्पत्तीच्या ठिकाणांचे निरीक्षण करणार आहे. तेथे औषध फवारणी केली जाईल. या घरभेटींचा अहवाल रोजच्या रोज तयार करण्यात येणार आहे. घर पाहणीला विरोध करणाऱ्यांचीही नोंद यात करण्यात येईल. पहिल्या भेटीच्या वेळी हिरव्या, तर दुसऱ्या भेटीच्या वेळी निळ्या रंगाची खूण केली जाणार आहे.

असा होतो डेंगीचा फैलाव
एडिस इजिप्ती या डासांपासून डेंगीचा फैलाव होता. पावसाच्या साचलेल्या पाण्यावर हे डास अंडी घालतात. त्यातून त्यांची पैदास पावसाळ्यात वाढते. नारळाच्या करवंट्या, टायर, फुटलेल्या बाटल्या, बाटल्यांच्या झाकणात साचलेल्या पावसाच्या पाण्यात हे डास आढळतात. नुकताच पाऊस पडून गेल्याने डासांची पैदास होण्यास हे पोषक वातावरण आहे. त्यामुळे ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

शहरात १६ दिवस घरोघरी जाऊन हे कीटक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यात धूर फवारणी आणि जनजागृतीसाठी पत्रके वाटप केली जातील. तसेच, सुरवातीला डास उत्पत्तीसाठी नोटीस बजावलेल्या ठिकाणी पुन्हा डासांची उत्पत्ती आढळल्यास संबंधित मिळकतदारांवर खटला भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
– डॉ. वैशाली जाधव, सहायक आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका

https://maharashtrabulletin.com/marriage-certificate-registration-pune/

पल्स पोलिओच्या धर्तीवर घराघरांत जाऊन डासनिर्मूलन करण्याचा कार्यक्रम आखला आहे. येत्या मंगळवारपासून याची सुरवात होणार असून, शहरातील सर्व मिळकतींची पाहणी करण्यात येणार आहे. त्यातून डास उत्पत्ती नियंत्रणात येऊन शहरातील संभाव्य डेंगीच्या उद्रेकाचा धोका कमी होईल.
– डॉ. कल्पना बळीवंत, विभागप्रमुख, कीटकरोग विभाग, पुणे महापालिका

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये
महापालिकेच्या पथकाने भेट दिल्याची नोंद खडूने करण्यात येईल.
घर बंद असल्यास दुसऱ्या दिवशी पुन्हा भेट देण्यात येईल.
प्रशिक्षित कर्मचाऱ्यांतर्फे पाहणी होणार.
जनजागृतीसाठी पत्रकांचे वाटप.
फॉगिंग मशिन उपलब्ध केली आहे.
दिवसभर सर्वेक्षण करण्यात येईल.

पुण्यातील डेंगी
महिने     रुग्ण संख्या
२१ ऑगस्टपर्यंत     १३४
जुलै     ५८
जून    ६
मे    ३
एप्रिल    ५

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5