मेट्रोच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिवसृष्टी बाबत संकेत
पुणे – कोथरूडमधील नियोजित शिवसृष्टीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्क साधून तोडगा काढणार आहेत. ही शिवसृष्टी जैववैविध्य उद्यानाच्या (बीडीपी) जागेत साकारण्याची चिन्हे आहेत, असे प्रशासकीय सूत्रांकडून समजले.
पुणे आणि नागपूरमधील मेट्रो प्रकल्पाच्या कामांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बुधवारी घेतला. त्या वेळी पुण्यातील मेट्रो प्रकल्पाची माहिती घेताना शिवसृष्टीचा विषय निघाला. त्या वेळी मुख्मंत्र्यांनी या बाबत राजकीय सहमती घडवून शिवसृष्टीउभारणार असल्याचे सांगितले. तसेच या बाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याशीही चर्चा करण्यात येईल, असे चर्चेच्या ओघात सांगितले. शहरातील मेट्रो प्रकल्पाने वेग घेतला आहे.
वनाज- रामवाडी मार्गाचे काम सुरू झाले आहे. तसेच या मार्गावर स्थानके उभारण्याचीही निविदा प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे आगामी काळात कचरा डेपोच्या पूर्वीच्या जागेवर मेट्रो स्थानक उभारले जाऊ शकते. या जागेशेजारी ‘बीडीपी’ची वनविभागाची जागा आहे. बीडीपीच्या जागेत संग्रहालयाला परवानगी असल्याचे राज्य सरकारने या पूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे त्या जमिनीवर शिवसृष्टीउभारता येईल, असा प्रशासकीय वर्तुळात सूर धरला जात आहे. त्या ठिकाणी शिवसृष्टी उभारता आली नाही, तर कोथरूड परिसरातशिवसृष्टी उभारण्यात येईल, असे सांगितले जात आहे.
https://maharashtrabulletin.com/ganesh-festival-pune-2017/
कोथरूडमध्ये शिवसृष्टीउभारावी आणि मेट्रो स्थानक भूमिगत ठेवावे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसृष्टीबाबत बैठकीत चर्चा झाली. या प्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित उपस्थित होते. तसेच पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, पिंपरी- चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत भाग घेतला.
…तरच ‘शिवसृष्टी’ दुसरीकडे !
या बाबत स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘‘महापालिका राज्य सरकारच्या मदतीने शिवसृष्टीउभारणार आहे. त्याला आमचे प्राधान्य असेल. कोथरूडमध्ये शिवसृष्टी आणि मेट्रो स्थानक एकाच ठिकाणी उभारता येईल का, या बाबत तज्ज्ञांच्या मदतीने तांत्रिक तपासणी केली जाईल. परंतु ते शक्य नसल्यास शिवसृष्टी अन्यत्र उभारावी लागेल.’’