Skip to content Skip to footer

महाराष्ट्र बंद : पुण्यातील तोडफोडप्रकरणी 185 जण ताब्यात

पुणे: मराठा मोर्चाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद दरम्यान पुण्यात झालेल्या तोडफोडीप्रकरणी, पोलिसांनी 185 जणांना ताब्यात घेतलं आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या आंदोलनाला काल हिंसक वळण लागलं.आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड केली. माध्यमांच्या प्रतिनिधींनाही यावेळी वार्तांकन करण्यापासून रोखण्यात आलं. त्यानंतर चांदणी चौकात पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. यावेळी अश्रूधुराचाही वापर करण्यात आला.या दगडफेकीत काही पोलिसही जखमी झाले.

दरम्यान, या सर्व राड्याप्रकरणी पोलिसांनी आता कारवाईला सुरुवात केली आहे. पोलिसांनी चांदणी चौक दगडफेक प्रकरणी 83, जिल्हाधिकारी कार्यालय राड्याप्रकरणी 5 महिलांसह 76, डेक्कन येथे रास्तारोको करणारे 21 असे एकूण 185 जणांना ताब्यात घेतलं. या सर्वांवर काल रात्री बंडगार्डन कोथरुड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

औरंगाबादमध्ये औद्योगिक वसाहतीत दगडफेक

औरंगाबादमध्येही काल मराठा मोर्चाच्या आंदोलनाला वाळूज औद्योगिक वसाहतीत हिंसक वळण लागलं. औद्योगिक वसाहतीतील 12 ते 13 कंपन्यांमध्ये दगडफेक तर 60 कंपन्यांचं नुकसान झालं.आंदोलकांनी कंपन्यांमध्ये घुसून मोडतोडही केली. वोक्हार्ड कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलकांनी मोठा गोंधळ घातला. मायलॉन, स्टरलाईट या कंपन्यांवरही दगडफेक करण्यात आली. शहरातील NRB चौकातही सायंकाळच्या सुमारास आंदोलकांनी गोंधळ घातला.

मराठा मोर्चाविरोधात याचिका

बंदच्या दरम्यान सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या आंदोलकांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. बंदची हाक देणाऱ्या आयोजकांकडून नुकसान भरपाई वसूल करण्यात यावी अशी मागणी या याचिकेत करण्य़ात आली आहे. द्वारकानाथ पाटील यांनी अॅड आशिष गिरी यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. यावर 13 ऑगस्टला सुनावणी होणार आहे.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5