अॅमेझॉन कंपनीच्या गोडाऊनमध्ये शिरून चोरटयांनी सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि 26) पहाटे साडेतीनच्या सुमारास लोहगाव येथील पवार वस्तीमध्ये घडली.
या प्रकरणी सौरभ शिंदे (वय 22,रा. वडगाव शेरी,पुणे) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौरभ शिंदे हे त्यांचे सहकारी व सिक्युरिटी गार्डसह काम करीत असताना पहाटे साडेतीनच्या सुमारास चार अनोळखी इसम कंपनीच्या आत आले. त्यांनी लोखंडी रॉड व चॉपरचा धाक दाखवून सौरभ शिंदे व त्यांचे सहकारी पवन तायडे यांना मारहाण करुन जखमी केले. तसेच लोखंडी रॉडने कंपनीचे लॅपटॉप फोडून कपाटातील 3 लाख 38 हजार 338 रुपये, फिर्यादी यांचा मोबाईल, कंपनीचा मोबाईल व सी.सी.टी.व्हीचा डी.व्ही. आर असा एकुण 3 लाख 60 हजार 338 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लुटला. विमानतळ पोलीस पुढील तपास करीत आहेत.