Skip to content Skip to footer

Pune : मेट्रोचे नवे आठ मार्ग प्रस्तावित

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पुणे मेट्रोपॉलिटन रिजनल डेव्हलमेंट अ‍ॅथॉरिटी- पीएमआरडीए) तयार केलेल्या सर्वंकष वाहतूक आराखडय़ात (कॉम्प्रिहेन्सिव मोबिलिटी प्लॅन- सीएमपी) शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो मार्गिकेबरोबरच मेट्रोचे नवे आठ मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. शिवाजीनगर-हिंजवडी मार्गाचे विस्तारीकरणही प्रस्तावित असून दोन टप्प्यात मेट्रो मार्गिकेचे जाळे उभारण्याचे नियोजन पीएमआरडीएकडून करण्यात आले आहे.

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून पहिल्या टप्प्यातील दोन मार्गाचे काम सुरू असून या मार्गाच्या विस्तारीकरणाबरोबरच नव्याने काही मार्ग मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातच पीएमआरडीएकडूनही मेट्रोचे आठ मार्ग प्रस्तावित असल्यामुळे भविष्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोचे मोठे जाळे निर्माण होणार असून प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे.

शहरात महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या मेट्रो मार्गिकांचे काम सध्या सुरू आहे. पीएमआरडीएची स्थापना झाल्यानंतर शिवाजीनगर ते हिंजवडी हा मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आला होता. त्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. पीएमआरडीएच्या मेट्रो मार्गिकेची प्रक्रिया सुरू असतानाच आठ नवे मार्ग भविष्यात करण्यात येतील, असे पीएमआरडीएकडून जाहीर करण्यात आले होते.

मेट्रोचे प्रस्तावित मार्ग
निगडी ते कात्रज
चांदणी चौक ते वाघोली
हिंजवडी ते शिवाजीनगर
हिंजवडी ते चाकण
सिंहगड रस्ता ते पुणे कॅन्टोन्मेंट
स्वारगेट ते वारजे
वाघोली ते हिंजवडी
चांदणी चौक ते हिंजवडी

Leave a comment

0.0/5