Skip to content Skip to footer

सर्वच विद्यार्थ्यांना आता ग्रेस गुणांचा लाभ : विद्यापीठाचा निर्णय

सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाने विद्यार्थ्यांना ग्रेस गुणांची सवलत देण्याच्या नियमावलीत बदल करण्याचा निर्णय घेतला असून चालू शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाच्या अंमलबजावणीस सुरूवात झाली. केवळ पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनाच नाही तर प्रथम व द्वितीय अशा सर्व वर्षाच्या विद्यार्थ्यांना ग्रेस गुणांचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे एखाद्या विषयात उत्तीर्ण होण्यासाठी एक ,दोन किंवा तीन गुण कमी पडत असल्यास संबंधित विद्यार्थी पास होणार आहेत.परिणामी नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण घटणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यापरीक्षा विभागातर्फे निकाल जाहीर करताना काही नियमावलीचा अवलंब केला जातो.मात्र,जुन्या नियमावलीनुसार केवळ शेवटच्या वर्षी पदवी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तीन गुण कमी असणा-या विद्यार्थ्यांनाच ग्रेस गुणांचा लाभ दिला जात होता. त्यामुळे एक,दोन किंवा तीन गुण कमी असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जात होते. परंतु, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा मंडळ, विद्या परिषद, अधिष्ठाता मंडळ,व्यवस्थापन परिषद या अधिकार मंडळांची मान्यता घेवून ग्रेस गुणांचा लाभ देण्याच्या नियमावलीत बदल करण्यात आला. सुमारे वर्षभर नियमावलीत बदल करण्याची प्रक्रिया सुरू होती.एकूण ग्रेस गुण देताना कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.तर अंतिम वर्षाच्या परीक्षेबरोबरच आता सर्व परीक्षांसाठी ग्रेस गुण दिले जावेत,अशी सुधारणा करण्यात आली आहे.

विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील विविध अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना या नियम बदलाचा लाभ होणार आहे. प्रामुख्याने द्वितीय वर्षात उत्तीर्ण होण्यासाठी एक , दोन किंवा तीन गुण कमी असल्यामुळे अनेक विद्यार्थी नापास होत होते. तर काही विद्यार्थ्यांना एटीकेटीसह तृतीय वर्षात प्रवेश घेवून हे विषय सोडवावे लागत होते. मात्र, विद्यार्थ्यांना गुणांची खिरापत न वाटता विद्यापीठाच्या पूर्वीच्याच नियमावलीत थोडा बदल करून नापास होणा-या विद्यार्थ्यांना ग्रेस गुण देवून उत्तीर्ण केले जाणार आहे. त्यामुळे नापास होऊन घरी बसणा-या विद्यार्थ्यांना पदवी प्राप्त करून पुढील शिक्षणाची व रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
यंदा वाणिज्य विद्याशाखेच्या द्वितीय वर्षाच्या ४ हजार ३४३ आणि बहिस्थ: अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या 194 विद्यार्थ्यांना ग्रेस गुणांची सवलत मिळाली आहे. विद्यापीठाच्या नियमावलीत बदल झाल्यामुळे यावर्षी नापास होणारे सुमारे १० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत विद्यापीठाने विद्यार्थी हिताचा विचार करून कायद्याचे काटेकोर पालन करून ग्रेस गुण देण्याबाबतच्या नियमावलीत बदल केला आहे.त्यासाठी विद्यापीठाच्या परीक्षा मंडळ,विद्या परिषद, अधिष्ठाता मंडळ,व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेण्यात आली आहे.

Leave a comment

0.0/5