Skip to content Skip to footer

नागपूर व पुण्यातील करोना स्थिती स्फोटक!

नागपूर आणि पुण्यामध्ये करोना रुग्णांची तसेच मरण पावणाऱ्या करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून ही स्थिती चिंताजनक असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. गणेशोत्सव तसेच अनलॉक यामुळे करोना रुग्णांची संख्या ऑगस्ट महिन्यात वाढली असून नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात १ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट दरम्यान तब्बल ८२६ करोना रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचलानयाने नागपूरमधील वाढते मृत्यू व रुग्णसंख्या यांचा अभ्यास करून उपाय सुचविण्यासाठी पुण्याच्या बी. जे. वैदयकीय महाविद्यालयाच्या औषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एस. ए. सांगळे व लातूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या बधिरीकरणशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. व्यंकटेश जोशी यांची समिती नियुक्त केली. या समितीने आपल्या अहवालात नमूद केले आहे की, गणेशोत्सव काळातील गर्दी तसेच लॉकडाउन उघडल्यानंतर लोक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आले व त्यातून करोना जास्त प्रमाणात वाढल्याचे दिसून येते.

याशिवाय घरोघरी सर्वेक्षण करण्याची गरज असून ५० पुढील कोमॉर्बीड लोकांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. रुग्ण व रुग्ण संपर्कातील लोकांचा शोध घेऊन उपचार करणे, करोना चाचण्यांचे प्रमाण वाढवणे आदी गोष्टी करण्याबरोबरच करोना रुग्णांना तातडीने उपचार मिळण्याची गरज आहे.  नागपूरमधील उपचाराचा मुख्य भार हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय प्रामुख्याने उचलत असून या दोन्ही महाविद्यालयात मिळून १२०० बेड आहेत तर अतिदक्षता विभागात ३६० बेड आहेत. एप्रिल ते जुलै या काळात जीएमसी नागपूर येथे ५४ करोना मृत्यू नोंदविण्यात आले तर आयजीएमसी नागपूर येथे ७० करोना मृत्यूंची नोंद आहे. मात्र १ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट या काळात या दोन्ही वैद्यकीय महाविद्यालयात ४१० व ४१६ करोना रुग्णांचे मृत्यू झाले. याचाच अर्थ एकट्या ऑगस्ट महिन्यात या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ८२६ करोना रुग्णांचे मृत्यू झाले.

नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ऑगस्ट महिन्यात मरण पावलेल्या करोना रुग्णांमध्ये ७८ रुग्णांचा रुग्णालयात दाखल होताच थोड्या वेळाने मृत्यू झाला हे प्रमाण १९.०२ टक्के तर २४ तासात ८७ जणांचे मृत्यू झाले ( २१.२२ टक्के) , एक ते तीन दिवसात ९६ जणांचे मृत्यू ( २३.४१ टक्के) तर तीन ते पाच दिवसात ५३ जणांचे मृत्यू ( १२.९३ टक्के) आणि ९६ करोना रुग्णांचे मृत्यू हे दाखल झाल्यावर पाच दिवसांनी झाले असू हे प्रमाण २३.४१ टक्के एवढ आहे. यात ४० ते ५० वयोगटातील ७७ जण, ५० ते ६० वयोगटातील १०८ आणि ६० ते ७० वयोगटातील १०२ रुग्णांचे मृत्यू झाले असून ७० वर्षावरील ७४ करोना रुग्णांचे मृत्यू झाले.

इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय ३१० रुग्णांचे मृत्यू रुग्णालयात दाखल झाल्यापासून पाच दिवसांच्या आत झाले तर ८९ रुग्णांचे मृत्यू हे सात दिवसानंतर झाले आहेत. महत्वाचे म्हणजे या दोन्ही वैद्यकीय महाविद्यालयात पुरेसे अध्यापक व डॉक्टर असून परिचारिकांचे प्रमाण थोडे कमी असल्याचे अहवालात म्हटले आहे. रुग्णांचा लवकरात लवकर शोध घेणे, कोमॉर्बीड रुग्ण शोध आणि रुग्ण संपर्कातील लोकांचा शोध याला प्राधान्य देण्याची शिफारस समितीने आपल्या अहवालात केली आहे.

नागपूरमध्ये करोना रुग्णांची संख्या ३९४७१ एवढी असून आतापर्यंत १०५२ लोकांचे मृत्यू झाले आहेत तर १७०८८ अॅक्टिव्ह रुग्ण म्हणजे रुग्णालयीन उपचाराअंतर्गत रुग्ण संख्या आहे. पुण्यातील परिस्थिती आणखी स्फोटक असून गणेशोत्सवाचा काळ वगळला तरी पुण्यात एकूणच लॉकडाऊनच्या काळातही लोक राजरोस फिरत होते. आजही अनेक भागात सोशल डिस्टंसिंग तसेच मास्क वापरण्यास लोक तयार नाहीत. यातूनच रुग्ण संख्या वेगाने वाढत असून पुण्याची करोना रुग्णांची संख्या राज्यात सर्वाधिक म्हणजे २,०३,४६८ एवढी आहे. ४४७० एवढे करोना मृत्यूंची नोंद असून ६१,७८१ अॅक्टिव्ह रुग्ण संख्या आहे. वाढत्या करोना रुग्णांमधे पुण्यात आजघडीला करोना रुग्णांना बेड मिळण्यात अनंत अडचणींचा सामना करावा लागत असून करोनाला अटकाव कसा करायचा हा प्रश्न आता सर्वांपुढे निर्माण झाला आहे.

Leave a comment

0.0/5