Skip to content Skip to footer

डेंगी चा संसर्ग महिलांना अधिक – आरोग्य विभागाचा निष्कर्ष

पुणे – शहरात पुरुषांच्या तुलनेत महिलांना डेंगी चा संसर्ग झाल्याचे ‘निदान’ महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. डेंगी चा सर्वाधिक डंख १५ ते २४ वर्षे वयोगटातील मुलींना झाला असून, ४५ ते ५४ वर्षांच्या दरम्यान वय असलेल्या पुरुषांना डेंगी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

आरोग्य विभागाचा निष्कर्ष; १५ ते २४ वयोगटातील मुली लक्ष्य

शहरात पावसाला सुरवात झाल्यानंतर डेंगीच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये डेंगीच्या रुग्णांचा संसर्ग झालेल्यांची संख्या चौपटीने वाढली आहे. जानेवारीपासून आतापर्यंत महापालिकेच्या हद्दीमध्ये डेंगीचे ३०७ रुग्ण आढळले आहेत. याच्या केलेल्या विश्‍लेषणातून ही माहिती पुढे आली आहे.

पावसाच्या साचलेल्या स्वच्छ पाण्यात मोठ्या प्रमाणात डासांची पैदास होत असल्याने त्यांच्या मार्फत पसरणाऱ्या डेंगी आणि चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहरातील ६५ टक्के डेंगीचा संसर्ग सोसायट्यांच्या परिसरात साचलेल्या पाण्यात होणाऱ्या डासांच्या उत्पत्तीतून होत आहे, असा निष्कर्ष महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या विश्‍लेषणातून मिळाला आहे. तसेच रुग्णालये, महाविद्यालयांमध्येही डेंगीचे डास आढळले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने स्त्री-पुरुष आणि त्यांच्या वयोगटनिहाय विश्‍लेषण केले आहे. त्यात पुरुषांच्या तुलनेत डेंगी झालेल्या महिलांची संख्या शहरात अधिक असल्याचे दिसते.

ठळक निष्कर्ष
शहरात जानेवारीपासून ऑगस्टपर्यंत आढळलेल्या ३०७ रुग्णांपैकी १४७ पुरुष असून, १६० महिला आहेत. पुरुषांमध्ये ४५ ते ५४ वर्षे वयोगटात २७ रुग्ण असून, महिलांमध्ये १५ ते २४ वर्षांच्या २९ मुलींना डेंगीचा संसर्ग झाला असल्याचेही यातून पुढे आले आहे.

डेंगी संसर्गावर दृष्टीक्षेप
वयोगट      पुरुष      स्त्री

५ वर्षांपर्यंत      १०      १८
६ ते १४        २२      २२
१५ ते २४      २३      २९
२५ ते ३४      २३      २५
३५ ते ४४      २१      २८
४५ ते ५४      २७      २२
५५+           २१      १६

शहरात कीटकजन्य आजाराबरोबरच हवेतून पसरणाऱ्या विषाणूंचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे स्वाइन फ्लूसह इतर फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. याच कालावधीमध्ये गणेशोत्सव सुरू आहे. त्यामुळे गणपती मंडळांचे देखावे पाहण्यासाठी जागोजागी गर्दी वाढत आहे. त्यातून या स्वाइन फ्लू पसरविणाऱ्या ‘एन१एन१’ सारख्या विषाणूंची प्रसार होतो. ताप, थंडी, सर्दी, खोकला, डोकेदुखी अशी लक्षणे असलेल्या रुग्णांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
– डॉ. अंजली साबणे, उपआरोग्य प्रमुख, पुणे महापालिका

महापालिकेने डेंगी नियंत्रणासाठी ठोस पावले टाकली आहेत. शहरातील घरोघरी जाऊन डेंगीच्या डासांचे सर्वेक्षण आणि नियंत्रण सुरू आहे. पावसाने विश्रांती दिल्याने ठिकठिकाणी धूर फवारणी सुरू आहे. त्यामुळे लवकरच डासांची पैदास नियंत्रणात येईल.
– डॉ. कल्पना बळीवंत, कीटकरोग विभाग प्रमुख, पुणे महापालिका

कशामुळे वाढतोय डेंगी?
पावसाचे पाणी टायर, बाटल्यांची झाकणे, नारळाच्या करवंट्यांमध्ये साचले. त्यात डेंगी पसरविणाऱ्या एडिस इजिप्ती डासांनी अंडी घातली. त्यातून पैदास झाली. त्याच वेळी घरातील फ्रिज, कुंड्या, फुलदाणी येथेही डासांच्या आळ्या आढळल्या.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5