Skip to content Skip to footer

बिहार निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाने बदलली आपली भाषा

बिहार निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाने बदलली आपली भाषा

बिहार विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार ७२ जागांवर आघाडीसह भाजप बिहार विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष ठरण्याची चिन्हे दिसू लागताच बिहारचे पुढचे मुख्यमंत्री नितीश कुमारच होतील, असे बोलणाऱ्या भाजपाच्या नेत्यांच्या वक्तव्यामध्ये बदल झाले आहे. यातून भाजप नितीश कुमारांना मुख्यमंत्रिपदी बसवण्याची शक्यता कमीच दिसत असल्याचे राजकीय निरीक्षकांना वाटत आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना भाजपच्या नेतृत्वातील एनडीए विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर केले होते. पुन्हा सत्ता आली तर नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील, असेही मतदानाच्या दिवसापर्यंत सांगितले होते. मात्र आता भाजपने भाषा बदलली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीचा अद्याप एकही निकाल लागलेला नाही. मात्र जे कौल हाती आले आहेत, त्यानुसार भाजप बिहार विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या निवडणुकीत नितीश कुमारांच्या जेडीयूला सर्वात मोठे नुकसान होताना दिसत आहे. केंद्रात एनडीएचा घटक पक्ष असलेल्या चिराग पासवान यांच्या लोजपाला भाजपनेच नितीश कुमारांच्या जेडीयूविरोधात निवडणूक मैदानात उतरवले, अशी जेडीयू कार्यकर्त्यांची भावना आहे.

बिहारमध्ये भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत येण्याची चिन्हे दिसू लागताच आता नितीश कुमारांना भाजप मुख्यमंत्री होऊ देणार की नाही, हा कळीचा मुद्दा आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांचे वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे. या निवडणुकीत मोदींच्या प्रतिमेने आम्हाला तारले आहे. सरकारची स्थापना आणि नेतृत्वाबाबत आज सायंकाळपर्यंत निर्णय घेऊ, असे सांगत बिहारचे नेतृत्व बदलण्याचे संकेतच विजयवर्गीय यांनी दिले आहेत.

Leave a comment

0.0/5