Skip to content Skip to footer

36 राफेल विमान खरेदी साठी मोदींनी 41 हजार 205 कोटी रूपये जादा का मोजले ?

नवी दिल्ली: राफेल विमान खरेदी प्रकरणात रिलायन्स इंडस्ट्रीज कडून खुलासा करणारे निवेदन प्रसिद्धीला देण्यात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर आज कॉंग्रेसने या प्रकरणात मोदी सरकारवरील आपला हल्ला अधिक तीव्र केला. कॉंग्रेसच्या प्रवक्‍त्या प्रियांका चर्तुवेदी यांनी म्हटले आहे की कॉंग्रेसने राफेल खरेदीचे दर प्रतिविमान 526 कोटी इतके निश्‍चीत केले होते. पण मोदी सरकारने हेच विमान 1670 कोटी रूपयाला एक या दराने खरेदी केले आहे. त्यांच्या 36 विमानांच्या खरेदीसाठी मोदी सरकारने 60145 कोटी रूपये मोजले आहेत.

आमच्या सरकारच्या करारानुसार 36 राफेल विमानांसाठी केवळ 18940 कोटी रूपये इतकाच खर्च आला असता. असे असताना मोदी सरकारने या विमानांसाठी 41205 कोटी रूपये जादा का मोजले असा सवाल त्यांनी केला. मोदींनी देशाच्या हिताला तिलांजली देऊन देशातील खासगी उद्योजकासाठी सरकारी पैशाची नासाडी केली आहे त्यावर त्यांनी खुलासा केला पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. राफेलच्या किंमतीबाबत संरक्षण मंत्री आणि पंतप्रधान संसदेला माहिती का देत नाहीत, हा सारा व्यवहार देशापुढे खुला झाला पाहिजे असा सवालही त्यांनी केला. संरक्षण साहित्य खरेदी साठी जी सरकारी नियमावली असते ती सारी मोडीत काढून मोदींनी व्यक्तीगत पातळीवर फ्रांस सरकारशी हा करार केला आहे असा आरोपहीं त्यांनी केला.

Leave a comment

0.0/5