Skip to content Skip to footer

काँग्रेसमुळेच करतारपूर पाकिस्तानात गेले; नरेंद्र मोदींचा पलटवार

हनुमानगढकरतारपूर कॉरिडॉरवरून विरोधी पक्ष भाजपवर आरोप करत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवरच पलटवार केला आहे. काँग्रेसच्या चुकांमुळेच करतारपूर पाकिस्तानात गेल्याचा दावा मोदी यांनी केला आहे. फाळणीच्या वेळी काँग्रेस नेत्यांनी समजूतदारपणा, संवेदनशीलता आणि गांभीर्य दाखवले असते तर करतारपूर हिंदुस्थानपासून वेगळे झालेच नसते, असे ते म्हणाले. काँग्रेसचा सत्तेचा मोह सर्वाना माहिती आहे. मात्र, सत्तेच्या मोहापायी काँग्रेसने घेतलेल्या अनेक चुकीच्या निर्णयाचे परिणाम देशाला आजही भोगावे लागत आहेत, असा आरोपही मोदी यांनी केला.

पाकिस्तानबाबत नवज्योतसिंग सिद्धू घेत असलेल्या नरमाईच्या भूमिकेवरून भाजपने सिद्धूच्या हेतूबाबत शंका उपस्थित केली होती. तर सिद्धूने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच हल्ला चढवला होता. मोदी यांनी राजस्थानमधील सभेत करतारपूरबाबत मत व्यक्त करून करतारपूर पाकिस्तानात जाण्यास काँग्रेसच जबाबदार असल्याचे सांगत काँग्रेसवर याचे खापर फोडले आहे. हिंदुस्थानात गुरुनानक देव यांचे स्थान काय आहे, जनतेची आस्था आणि श्रद्धा यांचा विचार काँग्रेसने फाळणीवेळी केला असता तर हिंदुस्थानपासून तीन किलोमीटरवर असलेले करतारपूर पाकिस्तानात गेलेच नसते असे ते म्हणाले. मात्र, सत्तेच्या मोहात बुडालेल्या काँग्रेसला समजूतदारपणा, संवेदनशीलता आणि गांभीर्य दाखवता आले नाही, असे मोदी म्हणाले. सत्तेच्या मोहापायी काँग्रेसने केलेल्या चुकांचे परिणाम आजही देशाला भोगावे लागत आहे. त्या चुका सुधारण्याची संधी जनतेने मला दिली आहे. माझे नशीब हातांच्या रेषांवर नसून सव्वाशे कोटी देशवासीयांच्या हातात असल्याचे ते म्हणाले.

राजस्थान ही वीरांची भूमी आहे, असे सांगत पंतप्रधानांनी नौसेना दिनाबाबत शुभेच्छा दिल्या. नौसेनेच्या सहा महिलांनी मेक इन इंडिया अभियानातंर्गत बनवलेल्या जहाजातून विश्वपरिक्रमा करून इतिहास घडवल्याचेही त्यांनी सांगितले. करतारपूरवरून मोदी यांनी काँग्रेसवर केलेल्या आरोपांमुळे पुन्हा नवा वाद सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave a comment

0.0/5