Skip to content Skip to footer

मोदींनी कधीच चहा विकला नाही, मीडियामुळेच बनले पंतप्रधान.

तिरुवअनंतपुरम: भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांना लक्ष्य केलं आहे. आपण वैयक्तिकरित्या वन मॅन शो आणि टू मॅन आर्मीच्या विरोधात असल्याचे त्यांनी म्हंटल असून मोदींनी कधीच चहा विकला नाही, मीडियामुळेच ते पंतप्रधान बनल्याचं सिन्हा यांनी म्हटलं आहे.

मोदींवर टीका करण्याची एकही संधी सिन्हा सोडत नाहीत. याआधीही त्यांनी अनेकवेळा मोदी व भाजपवर कडक शब्दात टीका केली आहे. तिरुवअनंतपुरम येथे काँग्रेसचे खासदार शशि थरुर यांच्या दि ‘पॅराडॉक्सिकल प्राईम मिनिस्टर’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यासाठी ते आले होते. त्यावेळीही त्यांनी मोदी व त्यांच्या धोरणांवर टीका केली. लोकशाहीमध्ये पक्ष हा नेहमीच व्यक्तीपेक्षा मोठा असतो. पण देश हा पक्षाहून मोठा असतो. म्हणूनच मी जे काही केलं आहे, बोललो आहे ते देशाच्या हितासाठीच असून यात माझं काहीही वैयक्तिक हित नाही. आजपर्यत मी कधीही माझ्या फायद्यासाठी कोणाजवळ बोललो नाही. देशातील जनतेला फक्त आश्वासनांची व जुमल्यांची नाही तर नोकरी व चांगल्या सोयीसुविधांची गरज आहे. असेही ते यावेळी म्हणाले.

तसेच अनेकवेळा मला तुम्ही अभिनेते आहात मग नोटबंदी , जीएसटी व इतर मुद्दयांवर का सल्ला देता असा सवाल केला जातो .पण जर एखादा वकील कुठल्याही अनुभव व ज्ञानाशिवाय आर्थिक मुद्द्यांवर बोलू शकतो, टीव्ही अभिनेत्री मनुष्यबळ विकास मंत्री बनू शकते जर चहावाला ज्याने कधीच चहा विकला नाही फक्त मीडियाच्या प्रचारामुळे त्या उच्च स्थानावर जाऊ शकतो तर मी का नाही बोलू शकत असे सांगत सिन्हा यांनी मोदींबरोबरच त्यांच्या मंत्रीमंडळातील स्मृती इराणी व इतरांवर निशाणा साधला. तसेच यावेळी त्यांनी नोटबंदीवरही भाष्य केले. बोलण्यात निष्णात असलेले पंतप्रधान दलित हत्या, दलित आत्महत्या, गोमांस या मुद्दयांवर का बोलत नाहीत असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Leave a comment

0.0/5