Skip to content Skip to footer

केस मुलायम आणि चमकदार बनविण्यासाठी आजमावा कोकोनट क्रीम

सुंदर, चमकदार केस हा आरोग्याचा आरसा असतो असे म्हणतात. पण वाढते प्रदूषण, प्रसाधनांचा अतिवापर, अपुरे पोषण यांमुळे केस निस्तेज दिसू लागतात. त्यातून ज्या महिला केसांवर निरनिराळ्या प्रक्रिया करून घेत असतात, त्यासाठी वापरण्यात येणारी उपकरणे आणि सौंदर्य प्रसाधने यांचेही दुष्परिणाम कालान्तराने केसांवर दिसून येऊ लागतात. अश्या वेळी केस रुक्ष, निस्तेज दिसू लागतात. त्याचप्रमाणे केस गळणे, दुभंगणे अश्याही समस्या उद्भवू लागतात. केस मुलायम आणि चमकदार बनविण्यासाठी उपकरणांचा किंवा रसायनांनी युक्त प्रसाधनांचा वापर न करता सम्पूर्णपणे नैसर्गिक पदार्थांनी परिपूर्ण असे कोकोनट क्रीम वापरण्याचा पर्याय अधिक योग्य ठरू शकतो. याचे दुहेरी फायदे असे, की एक तर हे क्रीम घरच्याघरी तयार करता येते आणि दुसरी आणि महत्वाची बाब ही, की यामध्ये वापरण्यात येणारे सर्व पदार्थ घरामध्ये सहज उपलब्ध होणारे आहेत.
hair1
या क्रीमच्या मदतीने केसांना पोषण मिळाल्याने केस चमकदार आणि मुलायमही होतात. ह क्रीम बनविण्यासाठी नारळाचे दुध, खोबरेल तेल किंवा बदामाचे तेल, दोन मोठे चमचे कॉर्नफ्लोर किंवा तांदुळाचे पीठ, आणि तीन मोठे चमचे लिंबाचा रस या साहित्याची आवश्यकता आहे. हे क्रीम तयार करण्यासाठी सर्वप्रथम ताजा नारळ खोवून घ्यावा. खोबऱ्यामध्ये थोडेसे दुध घालून खोबरे मिक्सरवर बारीक वाटून घ्यावे. हे वाटण एका कपड्यामध्ये काढून घेऊन घट्ट पिळून नारळाचे दुध काढून घ्यावे. या नारळाच्या दुधामध्ये खोबरेल तेल, किंवा बदामाचे तेल मिसळावे.
hair2
त्यानंतर तांदुळाच्या पीठामध्ये किंवा कॉर्नफ्लोरमध्ये लिंबाचा रस मिसळून घ्यावा. एका कढईमध्ये तेल मिश्रित नारळाचे दुध घालून त्याला मध्यम आचेवर एक उकळी आणावी. हे दुध जास्त उकळू नये. एक हलकी उकळी आल्याबरोबर त्यामध्ये त्वरित लिंबाचा रस आणि तांदुळाच्या पीठाचे मिश्रण घालावे. हे मिश्रण नारळाच्या दुधामध्ये घालताच दुध घट्ट होऊ लागेल. हे मिश्रण क्रीमप्रमाणे घट्ट होईपर्यंत चांगले हलवून घ्यावे, आणि त्यानंतर हे क्रीम बाटलीमध्ये काढून घ्यावे. थंड झाल्यानंतर हे क्रीम केसांना व्यवस्थित लावून घेऊन अर्धा तास केसांवर राहू द्यावे. अर्ध्या तासानंतर केवळ पाण्याचा वापर करून केसांमधून हे क्रीम काढून टाकावे आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे शँपू लावून केस स्वच्छ धुवावेत. या क्रीमच्या वापराने केस चमकदार आणि मुलायम झाल्याचे दिसून येईल.

Leave a comment

0.0/5