उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पुढील पाच वर्षांसाठीचे महाराष्ट्र शासनाचे औदयोगिक धोरण जाहीर केले आहे. मुंबई येथे झालेल्या बैठकीत या औदयोगिक धोरणा विषयी माहिती देण्यात आली होती, या नव्या धोरणामुळे राज्यात तब्बल १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून सुमारे ४० लाख रोजगार निर्मिती शक्य होईल असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बैठकीत पत्रकार माध्यमांना दिलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या वर्षात बेरोजगारीचा टक्का काही प्रमाणात कमी होण्याचे चिन्ह दिसून येत आहे.
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्याचे नवीन औद्योगिक धोरण जाहीर केले. यानिमित्ताने ‘औद्योगिक धोरण पुस्तिका २०१९’ तसेच ‘उद्योग वैभव’ या कॉफी टेबल पुस्तकाचे सुद्धा प्रकाशन करण्यात आले होते.
नाणार प्रकल्पाचे श्रेय लाटण्याचा राणे पिता-पुत्रांचा अजब प्रकार…
या नव्या औद्योगिक धोरणामुळे राज्यात परदेशी गुंतवणुकीचं प्रमाण वाढणार असून राज्याची अर्थव्यवस्था शंभर अब्ज डॉलर्सचा टप्पा पार करेल असा विश्वास राज्य सरकारने यावेळी व्यक्त केला आहे. या धोरणे नुसार उच्च तंत्रज्ञानावर आधारित आणि रोजगार निर्मिती करणाऱ्या उद्योगांना चालना दिली जाणार आहे.
तसेच लघु आणि मध्यम उद्योगांना सुद्धा प्रोत्साहन मिळेल. या धोरणात १८ ते ४५ वयोगटातील पात्र व्यक्तींना स्वयंरोजगाराचे धडे देण्यात येतील. मोठ्या उद्योगासाठी राज्यात लँड बँकेची सुद्धा निर्मिती करण्यात येणार आहे. औदयोगिक क्षेत्रात पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी क्रिटीकल इन्फ्रास्ट्रक्चर फंड उभा केला जाणार आहे अश्या अनेक घोषणां या औदयोगिक धोरणात जाहीर करण्यात आलेल्या आहे.
शिवसेना कधीही महाराष्ट्राच्या विकासाच्या आड आलेली नाही असे ही पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आवर्जून सांगितले आहे. तर उद्योग धोरण हे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सुचने नुसार राबवत असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यामुळे येणाऱ्या पाच वर्षात मोठया प्रमाणात महाराष्ट्रातील तरुण वर्गाला नोकरीच्या संधी उपलब्ध होणार असे ही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या कडून सांगण्यात आलेले आहे, उद्योगाच्या विकेंद्रीकरणासाठी विदर्भ, मराठवाडा आणि नक्षलग्रस्त भागांमध्ये उद्योग यावेत यासाठी विशेष प्रोत्साहन दिलं जाणार आहे असे ही आवर्जून सांगण्यात आलेले आहे.