लोकसभारिक्त जागेवर नियु्क्तीबाबत आज बैठक होत आहे. महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीमध्ये कॉंग्रेस आमदार आणि नेत्यांची बैठक होणार आहे. लोकसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ.सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर विखे पाटील यांनी देखील विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला. कॉंग्रेसकडून तो स्वीकारण्यात आला आहे.
पुढील तीन महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याने कॉंग्रेसला सक्षम विरोधी पक्षाची भूमिका निभावावी लागणार आहे. यासाठी विरोधी पक्षनेते पदी प्रभावी चेहरा देण्यासाठी कॉंग्रेसकडून चाचपणी केली जात आहे. विरोधीपक्ष नेते पदासाठी जेष्ठ नेते आणि विखे पाटलांचे विरोधक बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार यांची नावे आघाडीवर आहेत. विदर्भात काँग्रेसचं बळकटीकरण करण्यासाठी विजय वडेट्टीवार यांचा फायदा होईल, असं सांगण्यात येत आहे. पण प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे वडेट्टीवार यांच्याशी असलेले चांगेल संबंध हे यामागचं मुख्य कारण आहे असे बोलले जात आहे.