Skip to content Skip to footer

वादळी वाऱ्यासह वरुण राजाची जिल्ह्यात जोरदार हजेरी….

जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामुळे अनेक दिवसांपासून उष्णतेने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. शिरूर, खेड, आंबेगाव व दौंड या तालुक्यांत वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तर, काही घरांचे पत्रे उडाल्याने नुकसान झाले. पारगाव येथे विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामाची चाहूल लागली असून येत्या काही दिवसांत पेरणीसाठी शेत मशागतींच्या कामांना वेग येणार आहे.
आंधळगाव परिसरात घराचे पत्रे उडाले
रांजणसांडस : आंधळगाव परिसरात वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला. विजेच्या कडकडाटासह मुसळधार वाऱ्याने या भागात अनेक मोठमोठे झाडे तसेच अनेक घरावरील पत्रे उन्मळून शेतामध्ये पडले. परंतु, खूप मोठ्या प्रमाणात वारे  असल्यामुळे सुळवस्ती येथील  राहुल सुरेंद्र कदम यांच्या ५०-६० फूट घरांचे संपूर्ण पत्रे अँगलसहित वाऱ्यामुळे उडाले. तसेच, घराची भिंत कोसळली. सुदैवाने कुणाला इजा झाली नाही.  या भागात वाºयामुळे झालेल्या घरांच्या नुकसानाच्या भरपाईसाठी तहसीलदार, गावकामगार तलाठी यांनी या भागातील नागरिकांच्या घराची पाहणी करून योग्य तो पंचनामा करण्याची मागणी करण्यात आली.
तसेच आंबले, करडे, उरलागाव, आलेगाव पागा, रांजणगाव सांडस, नागरगाव, आंधळगाव, कुरुळी, इनामगाव, शिरसगाव काटा, वडगाव रसाई, मांडवगण फराटा, तांदळी, निर्वी या गावांना पाऊस चांगला बरसला. विजेच्या कडकडाटासह मुसळधार वाºयाने अनेक झाडे मुळापासून उन्मळून पडली. शुक्रवारी मेघगर्जनेसह पावसाने चांगली हजेरी लावली.
निमोणे परिसरात हलक्या सरी
निमोणे : निमोणे (ता. शिरूर) आणि परिसरामध्ये झालेल्या हलक्या पावसाने हजेरी लावली. या परिसरा करडे, लंघेवाडी, मोटेवाडी, गुनाट, चिंचणी, शिंदोडी परिसरात सायंकाळी ५ते ६च्या दरम्यान सोसाट्याच्या वा-यासह वरुणराजाने हजेरी लावली.  सकाळपासुनच वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. अखेर सायंकाळी पाऊसच झाला. झालेला पाऊस हा अतिशय अल्पसा असला तरी गेली अनेक महिने दुष्काळाची झळ सोसणा-या शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
वासुंदे : दौंड तालुक्याच्या जिरायत भागातील वासुंदे, जिरेगाव, हिंगणीगाडा, रोटी, कुसेगाव परिसरात आज दुपारी ४ च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहू लागल्याने पावसाच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, पावसाने हुलकावणी दिल्याने बळीराजा निराश झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. परंतु, पावसाने काही भागात हजेरी लावल्याने आज ना उद्या पाऊस पडेल, अशी भावना शेतकऱ्यांची झाली आहे.  दरम्यान वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांची धांदल उडाली. अनेक ठिकाणी छोटी-मोठी झाडे उन्मळून पडली. पाटस बारामती रस्त्यावरील रोटी घाटाच्या पायथ्याशी मार्गावर झाड पडल्याने काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता.
केडगाव :  पारगाव, देलवडी व एकेरीवाडी येथे  परिसरामध्ये गारांचा पाऊस झाला.  ७ जून रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक वादळी वारे वाहू लागले. पंधरा-वीस मिनिटांच्या विजांच्या कडकडाटानंतर पावसाला सुरुवात झाली. सुमारे एक तास पाऊस पडला. यामध्ये वादळी वाऱ्यामुळे बऱ्यां च ठिकाणी झाडे उन्मळून पडली. शेतातील  पिकांचे नुकसान झाले.  अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी समाधान वाटले. दिवसभरात उष्ण वातावरण होते; त्यामुळे पाऊस झाल्यानंतर सगळीकडे वातावरण थंडगार झाले. परिसरातील केडगाव, वाखारी, पिंपळगाव, बोरीपार्धी, खोपोडी, गलांडवाडी, खुटबाव, नाथाचीवाडी, नानगाव, दापोडी या गावांमध्ये कमीजास्त प्रमाणात पाऊस झाला आहे.

Leave a comment

0.0/5