Skip to content Skip to footer

मोबाईल वर जास्त वेळ घालवताय ? ‘या’ आजाराचा धोका

मुंबई : मोबाईल वर जास्त वेळ घालवनाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पण तुम्ही जर जास्त प्रमाणात स्मार्टफोनचा वापर करत असाल, तर तुम्हाला अटेंशन डेफिसिट हायपरअॅक्टिव्हिटी डिसऑर्डर (एडीएचडी) होण्याचा धोका तयार होऊ शकतो. ‘जामा’ नावाच्या वृत्तपत्रात याबाबत एक शोधनिबंध प्रकाशित झाला आहे.

‘सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करणाऱ्यांमध्ये एडीएचडीची लक्षणं 10 टक्के जास्त आढळून येतात. मुलींच्या तुलनेत मुलांमध्ये हा डिसऑर्डर होण्याचे प्रमाण जास्त आहे. तसंच किशोर वयातील अशी मुलं ज्यांना याआधी कधीतरी नैराश्य आलं आहे, त्यांना हा आजार होण्याचा धोका उद्भवतो,’ असं ‘जामा’ च्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

या डिसऑर्डरमुळे काय होऊ शकतं

अटेंशन डेफिसिट हायपरअॅक्टिव्हिटी डिसऑर्डरमुळे व्यसन करण्याची इच्छा होणे, जोखीम असणाऱ्या गोष्टी करण्याची इच्छा होणे यासारखे परिणाम होऊ शकतात.

या डिसऑर्डरमुळे मुलांचा शाळेतील परफॉरमन्सही खराब होऊ शकतो.

‘स्मार्टफोन्सची लोकप्रियता प्रचंड प्रमाणात वाढत आहे. आजचा तरुण फेसबुक, ट्विटर, यूट्यूब, इंस्टाग्राम यापैकी कमीत कमी एका अॅपच्या आहारी गेलेला असतो. यामुळे निद्रानाश किंवा कमी झोप यासारख्या समस्या तयार होतात. झोपण्याआधी लोक सर्वसाधारणपणे अर्धा ते एक तास सोशल मीडियावर घालवतात,’ असं हार्ट केअर फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. के. के. अग्रवाल सांगतात.

डिसऑर्डरची लक्षणं

लक्ष न लागणे, अतिसक्रियता, अचानक काहीतरी करणे अशी अटेंशन डेफिसिट हायपरअॅक्टिव्हिटी डिसऑर्डरची लक्षणं पाहायला मिळतात, अशी माहिती डॉ. अग्रवाल यांनी दिली.

काय काळजी घ्याल

झोपण्याआधी अर्धा तास कोणत्याही इलेक्ट्रॉनिक गॅजेटचा वापर न करणे, आठवड्यातील एक दिवस सोशल मीडियाचा वापर न करणे, संगणकाचा दिवसातून तीन तासांपेक्षा जास्त वापर न करणे, अशी काळजी घेतल्यास हा डिसऑर्डर टाळता येईल, असं हार्ट केअर फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. के. के. अग्रवाल यांनी सांगितलं.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5