Skip to content Skip to footer

भारताच्या संजीवनी जाधव ला रौप्यपदक

नागपूर – जागतिक पातळीवर पदक जिंकण्याचे नाशिकची धावपटू संजीवनी जाधव चे स्वप्न अखेर पूर्ण झाले. तैवान येथे सुरू असलेल्या जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत ॲथलेटिक्‍समधील दहा हजार मीटर शर्यतीत २१ वर्षीय संजीवनीने रौप्यपदकाला गवसणी घातली. अशी कामगिरी करणारी ती भारताची दुसरी धावपटू ठरली.

आंतर विद्यापीठ स्पर्धेत सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुण्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संजीवनी जाधव ला दोन वर्षांपूर्वी ग्वांग्झू (कोरिया) येथील स्पर्धेत दहा हजार मीटर शर्यतीत सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.

https://maharashtrabulletin.com/whatsapp-rollsout-colorful-text-status/

बुधवारी सायंकाळी दहा हजार मीटरची शर्यत अतिशय रंगतदार झाली. जपानच्या युकी मुनेहिसाने सुरवातीपासून घेतलेली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवली होती. शेवटच्या फेरीत मात्र आशियाई विजेत्या किर्गिझस्तानच्या दारिया मासलोवा, संजीवनी आणि जपानच्या अई मुनेहिसा यांनी वेग वाढविला. त्यात युकी मागे पडली. मात्र, विजेंदर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या संजीवनीला दारियाला मागे टाकता आले नाही. दारियाने ३३ मिनिटे १९.२७ सेकंदात सुवर्णपदक जिंकले.

दारियाने भुवनेश्‍वर येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत पाच व दहा हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते. दारियाने दोन्ही शर्यतीत संजीवनीवर मात केली होती. त्यापैकी पाच हजार मीटर शर्यतीत संजीवनीला ब्राँझपदक मिळाले होते. संजीवनीने ३३ मिनिटे २२.०० सेकंदात शर्यत पूर्ण करून रौप्यपदक जिंकले. जपानच्या अई होसोदाला ब्राँझपदक मिळाले.

भारताची वादग्रस्त धावपटू द्युती चंदला शंभर मीटर शर्यतीत दुसऱ्या फेरीत पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. थाळीफेकीत कमलप्रीत कौरने ५५.९५ मीटर अशी कामगिरी करीत अंतिम फेरी गाठली. चारशे मीटर शर्यतीत ट्विंकल चौधरीने उपांत्य फेरीत प्रवेश केला.

अवश्य वाचा – साईना नेहवाल चा सुखावणारा विजय

जागतिक स्पर्धेत भारताला दुसरे यश
दारिया आणि संजीवनी यांच्यातील ही एकूण चौथी शर्यत होती. तीन वर्षांपूर्वी तैवान येथेच दारियाने आशियाई ज्युनिअर स्पर्धेत तीन हजार मीटरमध्ये संजीवनीवर मात करीत सुवर्णपदक जिंकले होते, तर संजीवनीला ब्राँझपदक मिळाले होते. जागतिक ॲथलेटिक्‍स स्पर्धेत पदक जिंकणारी ती भारताची दुसरी ॲथलिट ठरली. यापूर्वी २०१३ मध्ये कझान (रशिया) आणि २०१५ मध्ये ग्वांग्जू (कोरिया) येथे इंदरजित सिंगने गोळाफेकीत अनुक्रमे रौप्य व सुवर्णपदक जिंकले होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मोहोर आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावण्याच्या स्पर्धेत उमटली, याचा मनापासून आनंद आहे. जागतिक स्तरावरील क्रीडा स्पर्धेत विद्यापीठाला मिळालेले हे पहिले पदक आहे. त्यामुळे संजीवनीचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. खेळाडूंना विद्यापीठाकडून सर्वतोपरी मदत केली जाते. विद्यार्थीदेखील यश मिळवत त्याचे चीज करीत आहेत.
– डॉ. नितीन करमळकर (कुलगरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5