एकदिवसीय मालिकेतही निर्भेळ यश
कोलंबो – भुवनेश्वर कुमारच्या पाच विकेट आणि विराट कोहली चे सलग दुसरे शानदार शतक, असा संगम जुळून आलेल्या भारताने श्रीलंकेविरुद्धचा पाचवाही एकदिवसीय सामना सहा विकेटने जिंकला आणि मालिकेतला स्कोअर ५-० असा केला.
एकदिवसीय मालिकेतील हा अखेरचा सामना असल्यामुळे भारताने चार बदल केले. त्यातच पहिल्यांदा नाणेफेक गमावली तरीही वर्चस्वाची मोहोर कायम राहिली. श्रीलंकेला २३८ धावांत गुंडाळल्यावर भारताने ४ बाद २३९ धावा केल्या.
भारताकडून एकापाठोपाठ एक पराभव स्वीकारावे लागलेल्या श्रीलंकेला अखेरच्या सामन्यातही भारताला झुंजवता आले नाही. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ३ बाद १८५ अशी सुरवात केली होती; परंतु काही वेळेतच त्यांचा डाव २३८ धावांत संपला. भारताने हे आव्हान ४६.३ षटकांत पार केले. विराटने नाबाद ११० धावांची खेळी केली. त्याचबरोबर एकदिवसीय क्रिकेटमध्ये रिकी पाँटिंगच्या ३० शतकांशी बरोबरी साधली.
या मालिकेत प्रथम संधी मिळालेला अजिंक्य रहाणे अपयशी ठरला, त्यानंतर रोहित शर्मा माघारी फिरला. २ बाद २९ अशी सुरवात झाली तरी त्याचे काहीच दडपण विराटने येऊ दिले नाही. त्याने प्रथम मनीष पांडे आणि त्यानंतर केदार जाधवसह विजय निश्चित केला. केदारने ६३ धावांचे योगदान दिले.
त्यापूर्वी, लाहिरू थिरीमन्ने (६७) आणि एंजेलो मॅथ्यूज (५५) यांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. श्रीलंकेकडून मालिकेत करण्यात आलेली ही पहिली शतकी भागीदारी होती. हे दोघे फलंदाज मैदानावर असताना श्रीलंका २५० धावांच्या पलीकडे मजल मारेल, अशी अपेक्षा होती; परंतु पुन्हा एकदा भुवनेश्वरने दणका दिला. थिरीमन्ने बाद झाला आणि श्रीलंकेचा डाव घसरत गेला. श्रीलंकेने अखेरचे सात फलंदाज अवघ्या ५३ धावांत गमावले.
https://maharashtrabulletin.com/dhoni-driving-bumrah-car/
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका – २३८ (उपुल चंदना ४८ -३४ चेंडू, ९ चौकार; लाहिरू थिरीमन्ने ६७ -१०२ चेंडू, ३ चौकार, १ षटकार; एंजेलो मॅथ्यूज ५५ -९८ चेंडू, ४ चौकार; भुवनेश्वरकुमार ९.४-०-३२-५, जसप्रीत बुमराह १०-०-४५-२, कुलदीप यादव १०-०-४५-२, युजवेंद्र चहल १०-०-३६-१). पराभूत वि. भारत – ४६.३ षटकांत ४ बाद २३९ (रोहित शर्मा १६, विराट कोहली नाबाद ११० -११६ चेंडू, ९ चौकार मनीष पांडे ३६, केदार जाधव ६३ -७३ चेंडू, ७ चौकार).
यष्टिरक्षक धोनीचे ‘स्टम्पिंग’चे शतक
भारताचा यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनी याने यष्टिरक्षक म्हणून सोमवारी फलंदाजांना ‘स्टम्पिंग’ (यष्टिचीत) करण्याचे शतक पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो क्रिकेट विश्वातील पहिलाच यष्टिरक्षक ठरला. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर अकिला धनंजयला बाद करून त्याने ही कामगिरी केली. धोनीने सर्वाधिक १९ फलंदाजांना हरभजनच्या गोलंदाजीवर यष्टिचीत केले आहे. त्यानंतर जडेजाच्या गोलंदाजीवर १५, तर अश्विनच्या गोलंदाजीवर १४ फलंदाजांना त्याने यष्टिचीत केले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये यष्टिमागे सर्वाधिक बळी टिपण्यात मात्र, संगकाराच (४८२ = ३८३ झेल + ९९ यष्टिचीत) आघाडीवर आहे. अर्थात दुसरे स्थान धोनीचेच (३८१ = २८१ झेल + १०० यष्टिचीत) आहे.