Skip to content Skip to footer

रशिया स्पर्धेत सौरभ वर्मा विजेता 

नवी दिल्ली – सौरभ वर्मा ने रशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपदास गवसणी घातली, पण त्यानंतरही त्याने आपल्या खेळात अजून खूप सुधारणा करण्याची आवश्‍यकता असल्याचे सांगितले.

माजी राष्ट्रीय विजेत्या सौरभने जपानच्या कोकी वॅटानाबे याचा पहिला गेम गमावल्यावर पराभव करीत अंतिम लढतीत बाजी मारली. त्याने 75 हजार अमेरिकन डॉलर बक्षीस रकमेच्या या सुपर टूर 100 मालिकेतील निर्णायक लढत 19-21, 21-12, 21-17 अशी जिंकली. गेल्याच महिन्यात बंगळूरला अखिल भारतीय मानांकन स्पर्धा जिंकत त्याने आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवले. हे यश रशिया ओपन जिंकत जणू साजरे केले. “खेळात चांगली प्रगती होत आहे, पण अजूनही अनेक क्षेत्रांत खेळ उंचावण्याची गरज आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दृष्टीने तंदुरुस्तीकडे लक्ष दिले आहे, त्याचा फायदा कामगिरी उंचावण्यास नक्कीच होईल,’ असे त्याने सांगितले.

अंतिम लढत खूपच खडतर होती. त्यात जिंकलो त्याचे नक्कीच समाधान आहे. मोसमातील पहिल्याच आंतरराष्ट्रीय विजेतेपदाने आत्मविश्‍वास नक्कीच उंचावला आहे, असे सौरभने सांगितले. तो म्हणाला, गेल्या तीन दिवसांच्या तुलनेत आज शटल खूपच कमी वेगाने येत होती. त्यामुळे सूर गवसण्यास वेळ लागला. त्यातच प्रतिकूल बाजूने मला सुरवात करावी लागली. तेथून खेळताना शटल व्हाईट बॅकग्राउंडमुळे चटकन नजरेत येत नव्हते. दुसऱ्या गेममध्ये प्रतिस्पर्ध्यास याचाच त्रास झाला.

पंचवीस वर्षीय सौरभने दोन वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली. त्याने 2016 च्या तैवान ग्रांप्री स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते, त्यानंतर बिटबर्गर स्पर्धेत उपविजेता होता. मात्र त्यानंतर दुखावलेल्या घोट्याचा त्याच्या कामगिरीवर परिणाम झाला. या वर्षी तो ऑस्ट्रेलियन तसेच न्यूझीलंड स्पर्धेत सलामीलाच पराजित झाला होता.

रोहन-कुहूला दुहेरीचे उपविजेतेपद 
रोहन कपूर आणि कुहू गर्गने या स्पर्धेत उपविजेतेपद जिंकले. त्यांना रशिया-कोरियाच्या जोडीविरुद्ध अंतिम फेरीत हार पत्करावी लागली. रोहन-कुहू हे व्लादिमीर इवानोव- मिन युंग किम यांच्याविरुद्ध 19-21, 17-21 असे पराजित झाले.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5