IND vs ENG: विराटनं वनडेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना १० हजार धावा केल्या पूर्ण, फक्त पॉन्टिंग विराटच्या पुढे

महाराष्ट्र बुलेटिन : भारतीय कर्णधार विराट कोहलीने शुक्रवारी इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या वनडे मध्ये आणखी एक विक्रम नोंदविला. या फॉरमॅटमध्ये तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करताना विराटनं १०,००० धावा पूर्ण केल्या. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग नंतर असे करणारा तो दुसरा फलंदाज ठरला. वनडेमध्ये पॉन्टिंगने सर्वाधिक १२६६२ धावा केल्या आहेत. त्याने ३३५ डावात या धावा केल्या आहेत. या दरम्यान पॉन्टिंगने २९ शतकेही केली आहेत. त्याचबरोबर कोहलीने १९२ सामन्यात १० हजार धावा पूर्ण केल्या. त्याच्या आता १००४६ धावा झाल्या आहेत.

सध्याच्या क्रिकेटपटूंबद्दल बघितले तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनचा कोहलीनंतर क्रमांक लागतो. त्याने तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करताना ५०.६६ च्या सरासरीने ११९ सामन्यांत ५४२१ धावा केल्या आहेत. एकूणच या यादीमध्ये श्रीलंकेचा कुमार संगकारा (९७४७) तिसर्‍या आणि दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस (७७७४) धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे. संगकाराने २४३ आणि कॅलिसने २०४ सामन्यात इतक्या धावा केल्या आहेत.

विराट पुन्हा एकदा शतकापासून दूर

या सामन्यात देखील विराटला शतकापासून दूरच राहावे लागले. ६६ धावा काढून विराट बाद झाला. इंग्लंडचा लेग स्पिनर आदिल रशीदने त्याला बाद केले. रशीदने एकदिवसीय सामन्यात तिसऱ्यांदा कोहलीला आपला बळी बनवले. बटलरने विकेटच्या मागे त्याचा झेल टिपला. यापूर्वीच्या सामन्यात कोहलीला एकदा जीवदान मिळाले होते. २२ व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर इंग्लंडचा कर्णधार आणि यष्टीरक्षक जोस बटलरने त्याचा झेल सोडला होता. आदिल रशीदचीच ती ओव्हर होती. यावेळी कोहली ३५ धावांवर खेळत होता. मात्र, या जीवदानानंतरही त्याला शतक करता आले नाही.

विराटने वनडेमध्ये तिसर्‍या क्रमांकावर ३६ शतके ठोकली

विराटने तिसर्‍या क्रमांकावर खेळत ३६ शतके केली आहेत आणि त्याची सरासरी ६२ पेक्षा जास्त राहिली आहे. उर्वरित सात शतक त्याने तिसर्‍या क्रमांकाच्या खाली खेळत केली आहेत. विराटने आपल्या एकदिवसीय कारकीर्दीची सुरुवात श्रीलंकेविरुद्धच्या डेब्यू मालिकेत सलामीवीर म्हणून केली होती. त्यानंतर त्याने काही डावांमध्ये चौथ्या आणि सातव्या स्थानावर फलंदाजी केली. पण २०१२ पासून तो सलग तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करीत आहे. या क्रमांकाची त्याची सरासरी वनडे कारकिर्दीपेक्षा चांगली आहे. विराटने तीननंतर चौथ्या क्रमांकावर सर्वाधिक ४२ सामने खेळले आहेत. या क्रमांकावरही त्याने चांगली कामगिरी केली आहे. येथे खेळत त्याने ५५.२१ च्या सरासरीने १७६७ धावा केल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here