नवी दिल्ली – एनडीए च्या रामनाथ कोविंद यांनी आज संसदेच्या ऐतिहासिक “सेंट्रल हॉल’मध्ये भारताचे 14 वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उप राष्ट्रपती हमीद अन्सारी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यासह सर्व पक्षांचे वरिष्ठ नेते यावेळी सभागृहात उपस्थित होते. कोविंद यांना सरन्यायाधीश जे एस खेहर यांच्या हस्ते शपथ देण्यात आली.
“भारताचे राष्ट्रपतीपद मी अत्यंत नम्रतेने स्वीकारत आहे. ही जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आल्याबद्दल मी सर्वांचा अत्यंत ऋणी आहे.” तसेच “डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉ ए पी जे अब्दुल कलाम आणि प्रणवदांसारख्या महान व्यक्तींनी भूषविलेले पद मला मिळाले आहे; त्यांच्या मार्गावर चालण्याची संधी मिळणे, हा माझा बहुमान आहे,’ अशी भावना कोविंद यांनी यावेळी व्यक्त केली.
“आज पर्यंत आपण एक राष्ट्र म्हणून खूप काही मिळविले आहे; अशीच आणखी प्रगती करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, आपण सर्व एक आहोत व एकच राहू,” असे राष्ट्रपती म्हणाले.
राष्ट्रपतीपदाच्या शपथग्रहणावेळी कोविंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व इतर मान्यवरांना धन्यवाद दिले.
कोविंद यांनी बिहारच्या राज्यपाल पदाची जबाबदारी सांभाळली आहे तसेच त्यांनी दिल्ली उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयामध्ये 16 वर्षे वकिली केली आहे. याशिवाय कोविंद यांची राज्यसभा सदस्य म्हणूनही दोनदा निवड झाली आहे.