राजधानी मुंबई मध्ये आज सकाळी 11 वाजता भायखळ्याच्या वीर जिजामाता उद्यानापासून सुरु झालेला मराठा क्रांती मोर्चा, दोन तासात शिस्तबद्धपणे आझाद मैदानात दाखल झाला. आझाद मैदानात पोहोचल्यानंतर या मोर्चातल्या तरुणींनी आपल्या मनातला आक्रोश उपस्थित जनसागरासमोर मांडला. तर मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिलं.
‘एक मराठा, लाख मराठा’ म्हणत आज मराठा बांधवांनी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आपले म्हणणे राज्यसरकार पुढे मांडले. भायखळा ते आझाद मैदान असा मोर्चा काढून मराठा शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द केलं.
मराठा क्रांती मोर्चा च्या माध्यमातून मागण्यात आलेल्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे:
कोपर्डीतल्या नराधमांना फाशी द्या
मराठा समाजाला आरक्षण द्या
अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये आवश्यक बदल करा
यासह अन्य मागण्या देण्यात आल्या.
मराठा क्रांती मोर्चा बाबत मुख्यमंत्र्यांचं निवेदन पुढील प्रमाणे
“कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा खटला अंतिम टप्प्यात असून लवकरच युक्तिवाद सुरु होईल. या प्रकरणात एका साक्षीदाराचा जबाब शिल्लक आहे. याबाबत सरकारकडून कोणताही उशिर होत नाही,” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
मराठा मोर्चासंदर्भात आज विधानसभेत चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं.
तसंच मराठा आरक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी विहित कालावधीची मर्यादा देणार असल्याचं मुख्यमंत्री विधानसभेत म्हणाले. तसंच मराठा समाजासाठी मंत्रिमंडळ उपसमिती नेमून दर तीन महिन्याला समन्वय ठेवण्यासाठी चर्चा केली जाईल.
“छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना ओबीसींप्रमाणे आता मराठा समाजासाठीही आणली जाईल. तसंच मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना 6 लाखांच्या ईबीसी मर्यादेसाठी 60 टक्के गुणांची अट 50 टक्क्यांवर आणली. 605 अभ्यासक्रमांमध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना सवलत मिळेल. यापूर्वी फक्त 35 अभ्यासक्रमांसाठीच मराठा समाजाला सवलत होती. तसंच आण्णासाहेब पाटील महामंडळांचे तीन लाख तरुण स्किल ट्रेनिंग देतील. तर दहा लाखांपर्यंत कर्ज देण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण करणार असून यासाठी पाच कोटी दिले जातील,” असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.