Skip to content Skip to footer

लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणुकीने फिटले डोळ्यांचे पारणे

‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष आणि ‘पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणत पुणेकर गणेशभक्तांनी लाडक्‍या बाप्पाला निरोप दिला.

पुणे – ऐश्‍वर्याचे प्रतीक असलेल्या आणि लक्ष-लक्ष दिव्यांनी उजळून निघालेल्या धूम्रवर्ण रथात विराजमान झालेली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टची श्रींची विलोभनीय मूर्ती, तर महाराष्ट्राचे कुलदैवत तुळजाभवानीच्या रूपात साकारलेल्या जगदंब रथात विसावलेली अखिल मंडई मंडळाची शारदा गजाननाची नयनमनोहर मूर्ती मध्यरात्री लक्ष्मी रस्त्यावर दाखल झाली. क्षणार्धात हजारो मोबाईल कॅमेरे तो क्षण टिपण्यासाठी सरसावले. ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष आणि ‘पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणत पुणेकर गणेशभक्तांनी लाडक्‍या बाप्पाला निरोप दिला.

लक्ष्मी रस्त्यावरील वैभवशाली मिरवणुकीत रात्रीचे आकर्षण असलेल्या शारदा गजानन आणि दगडूशेठ यांचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी उसळली होती. दरवर्षी बारा ते दोन या वेळेत बेलबाग चौकातून मुख्य मिरवणूक मार्गावर हे दोन्ही गणपती मार्गस्थ होतात. या वर्षी ही वेळ चुकवत सव्वा बाराच्या सुमारास अखिल मंडई मंडळाचा सनई- चौघड्याचा गाडा बेलबाग चौकात आला, त्या वेळी बेलबाग चौकात गणेशभक्तांची गर्दी उसळली. गर्दीचा महापूर उसळला. दोन ढोल पथके आणि न्यू गंधर्व बॅंड यांच्या सुरेल वादनानंतर भक्तिरथात विराजमान झालेली शारदा गजाननाची मूर्ती एक वाजून २० मिनिटांनी बेलबाग चौकात आली. हे मंडळ गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन तास आधीच चौकात दाखल झाल्याने गर्दीने उच्चांक गाठला.

https://maharashtrabulletin.com/ganpati-bappa-miravnuk-updates-pune/

चिरमाडे बंधूंनी साकारलेल्या ३२ फुटी ‘जगंदब’ रथावर तुळजाभवानीच्या चरणांशी विसावलेली शारदा गजाननाची मूर्ती मुख्य विसर्जनमार्गावर आली. सुगंधी धूप, विविधरंगी नैसर्गिक फुलांची सजावट, आकर्षक विद्युत रोषणाई आणि सनई- चौघड्याच्या सुरावटीत हे वातावरण भक्तिमय झाले. बेलबाग चौकात श्रींची आरती झाली. मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास ‘बाप्पा मोरया’चा जयघोष झाला आणि जगदंब रथ मिरवणूक मार्गस्थ झाला.

पाठोपाठ शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा करणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचा नगारा आणि विविध सामाजिक संदेश देणारा ‘मानव सेवा’ रथ बेलबाग चौकात दाखल झाला. प्रभात बॅंडने सादर केलेले ‘वंदे मारतम्‌’, तर दरबार ब्रास बॅंडच्या ‘सारे जहाँ से अच्छा’ आणि स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांनी रचलेल्या ‘जयोस्तुते जयोस्तुते’ या देशभक्तिपर सुरावटीने बेलबाग चौकात जमलेल्या गणेशभक्तांना ताल धरायला लावला. लक्ष- लक्ष रंगीबेरंगी दिव्यांच्या प्रकाशाची उजळण करत धूम्रवर्ण रथात विराजलेली श्रींची तेजोमय मूर्ती चौकात दाखल झाली. त्याच क्षणी भाविकांचे हात श्रद्धेने आपोपाप जोडले गेले. पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांच्या हस्ते आरती झाल्यानंतर बाप्पाच्या जयघोषात धूम्रवर्ण रथ पहाटे पावणेतीनच्या सुमारास लक्ष्मी रस्त्यावर मार्गस्थ झाला आणि बेलबाग चौकातील गर्दी ओसरली. सकाळी सव्वासातला टिळक चौकात महापौर मुक्ता टिळक यांनी मंडळाचे स्वागत केले.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5