काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांचे पती रॉबर्ट वढेरा यांनी रविवारी दिल्लीमध्ये मतदान केलं. त्यानंतर शाई लावलेल्या बोटासह सेल्फी ट्विट केला, पण त्या ट्विटमुळे वढेरा यांची चांगलीच गोची झाली. कारण, ट्विट करताना त्यांनी चुकून भारताऐवजी पॅराग्वेच्या झेंड्याचा इमोजी वापरला.
आपला अधिकार, आपलं सामर्थ्य, या देशाच्या उज्वल भविष्यासाठी आम्हाला सगळ्यांच्या पाठिंब्याची गरज आहे…प्रत्येकाने मतदानासाठी बाहेर पडा…असं मतदानाचं आवाहन करणार ट्विट त्यांनी केलं होतं. पण ट्विटच्या अखेरीस इमोजी वापरताना त्यांनी भारताच्या झेंड्याऐवजी चुकून पॅराग्वे या देशाच्या झेंड्याचा वापर केला. नेटकऱ्यांच्या आणि भाजपा समर्थकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी वढेरा यांना ट्विटरवर ट्रोल करण्यास सुरूवात केली. आपली चूक लक्षात येताच वढेरा यांनी तातडीने ते ट्विट डीलिट केलं, व झालेली चूक मान्य करत नव्याने ट्विट केलं पण तोपर्यंत ते ट्रोल झाले होते.
नव्याने केलेल्या ट्विटमध्ये वढेरा यांनी हातात भारताचा झेंडा घेतलेला स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आणि भारत माझ्या मनात आहे, तिरंग्याला माझा सलाम. माझ्या आधीच्या पोस्टमध्ये पॅराग्वेचा झेंडा चुकून वापरण्यात आला…ती एक चूक होती हे तुम्हालाही लक्षात आलं, या देशात चर्चा करण्यासाठी अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत पण तरीही तुम्ही माझ्या चुकीवर चर्चा करण्याचं ठरवलं याचं दुःख वाटतं…असं ट्विट केलं.