Skip to content Skip to footer

दिव्यांग जान्हवीची यशोभरारी; आयएएस होण्याचे ध्येय

जिद्द असली की कोणताही अडथळा, कोणतीही कमतरता तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही. जन्मापासून ८५ टक्के दिव्यांग असलेल्या जान्हवीने हे दाखवून दिले. व्हीलचेअरशिवाय चालताही न येणाऱ्या जान्हवीने सैन्याधिकारी असलेल्या वडिलांप्रमाणे कठीण प्रसंगाला तोंड देण्याची जिद्द बाळगत यश मिळविले.

जान्हवी मनीष किन्हीकर या विद्यार्थिनीचे हे यश आईवडिलांच्या डोळ्यातील अश्रूंमधून जाणवते. जान्हवीने इंग्रजी माध्यमातून कला विभागात ८९ टक्के गुण प्राप्त केले आहेत. तिचा जन्म म्हणजे घरात आनंद देणारा होता. पण स्पायना बायफिडा या आजारामुळे अपंगत्व येण्याची बाब घरच्यांना चटका लावणारी. पण आईवडिलांनी आपल्या लाडक्या लेकीला ही कमतरता जाणवू दिली नाही. खरं तर सुरुवातीला स्वत:ची ही अवस्था तिलाही निराश करणारीच होती, आईवडिलांच्या भक्कम आधारामुळे असलेली परिस्थिती स्वीकारण्यात आनंद मानला. मात्र ही कमतरता आपल्या गुणवत्तेने दूर करण्याची जिद्द तिने बाळगली. वायुसेनानगर येथे केंद्रीय विद्यालयात दहावीमध्ये ८.६ सीजीपीएने उत्तीर्ण होऊन स्वत:मध्ये असलेले कौशल्य सिद्ध केले.

बारावीतही ८५ टक्केपेक्षा अधिक गुण मिळविणारच, ही जिद्द तिच्यात होती आणि ८९ टक्के गुणांसह ती पूर्णही केली. विशेष म्हणजे हे सर्व तिने स्वत: अभ्यास करूनच प्राप्त केले. हिस्लॉप महाविद्यालयात प्रवेश केला, पण वर्गात बसली नाही. केवळ प्रात्यक्षिक परीक्षेपुरती तिची उपस्थिती असायची. यावेळी शिक्षकांचे मार्गदर्शन तिला मिळाले. हे मार्गदर्शन, स्वत:चे परिश्रम व आईवडिलांचा विश्वास या भरवशावरच तिने हे यश संपादन केले आहे. आता सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षेचे ध्येय तिने मनाशी बांधले आहे आणि ते पूर्ण करण्याचा आत्मविश्वास तिच्या प्रसन्न चेहऱ्यावर दिसूनही येतो.

Leave a comment

0.0/5