Skip to content Skip to footer

शिक्षक भरतीला ‘पवित्र’चा अडसर; पोर्टल वारंवार ठप्प

सांगली : राज्यातील बारा हजारावर जागांवर पवित्र पोर्टलमार्फत सुरू असलेल्या शिक्षक भरतीला पोर्टलच्या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या आठवड्यापासून प्राधान्यक्रम भरण्यास विद्यार्थ्यांची गर्दी होत असताना, पोर्टल वारंवार बंद पडत आहे. त्यामुळे प्रक्रिया पूर्ण करून शाळा सुरू होण्याच्या पहिल्यादिवशी तरुणांना शिक्षण सेवेत रूजू होण्याचा मुहूर्त हुकणार आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी शिक्षण संस्थांमधील १२ हजारांवर जागा भरण्यात येणार आहेत. उमेदवारांच्या पात्रता व विषयांनुसार प्राधान्यक्रम यादी येत आहे. मात्र, ही यादी अंतिम करता येत नाही. त्यातच विज्ञान शाखेतील काही विषयांचा समावेशच नसल्याची बाब समोर आली आहे. आता शुक्रवारपासून पूर्ण पोर्टलच बंद पडत आहे. प्राधान्यक्रम भरण्यास अगोदर २२ मे पासून ३१ मे पर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, या सर्व अडचणीमुळे ४ जूनपर्यंत मुदत वाढविण्यात आली असली तरी या मुदतीतही प्राधान्यक्रम भरून होणार नाहीत, अशी स्थिती आहे.

प्राधान्यक्रमातील गोंधळ अजूनही कायम आहे. मराठी माध्यमातून डी. एड्. केलेल्या तरुणांना इंग्रजी माध्यमातील जागा प्राधान्यक्रमात दाखवित आहेत, तर इंग्रजीच्या तरुणांना मराठीच्या जागा दाखवत आहेत. त्यामुळे दिलेल्या मुदतीत प्राधान्यक्रम भरायचे की दुरूस्तीबाबत थांबायचे, या द्विधा मनस्थितीत तरुण आहेत. नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. परिणामी सदोष यंत्रणेमुळे तरुणांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे.

शिक्षक भरतीचा फॉर्म नको रे बाबा…
प्राधान्यक्रम देण्यास सुरुवात झाल्यापासून अनेक तरुण-तरुणी शहरातील नेटकॅफे, ई-सेवा केंद्रात जाऊन प्राधान्यक्रम भरण्याबाबत चौकशी करत आहेत. मात्र, पोर्टल वारंवार बंद पडत असल्याने तरुणांनी फॉर्म भरण्याविषयी विचारले, तर शिक्षक भरतीचा फॉर्म नको रे बाबा, असे नेटचालक म्हणत आहेत.

Leave a comment

0.0/5