मराठा विद्यार्थ्यांची फी भरण्यास ठाकरे सरकारची तयारी?
मराठा आरक्षणाला स्थगिती दिलेली असताना वैद्यकीय शाखेतील प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून प्रवेश प्रक्रिया सुरु करणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली. महत्त्वाचं म्हणजे वैद्यकीय शाखेतील प्रवेशात आरक्षणापासून वंचित राहणार्या मराठा विद्यार्थ्यांच्या फीचा भार राज्य सरकार उचलणार, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांची फी भरण्यासाठी ठाकरे सरकारनं एक प्रस्ताव आणलेला असून, त्यात एमबीए, मेडिकल, इंजिनिअरिंगसह अनेक अभ्यासक्रमांचा त्यात समावेश आहे. आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानं ठाकरे सरकार विद्यार्थ्यांची फी भरण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं आहे.
मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयानं जी अंतरिम स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी बाधित होणार आहेत. त्यांना कशा पद्धतीनं दिलासा द्यायचा याचा विचार महाराष्ट्र शासन करत असल्याचीही माहिती अमित देशमुख यांनी दिली. तसेच मंत्रिमंडळामध्ये हा प्रस्ताव ठेवण्यात येणार असून, त्यावर चर्चा होईल, त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंदर्भात निर्णय घेतील, असंही अमित देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.