उत्तर महाराष्ट्रात मुख्यमंत्रीचा दावेदार असलेलं हे पद मी ब्राह्मणाला दान म्हणून दिलं! – एकनाथ खडसे
भाजपचे माजी जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिट्टी देत अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला होता. दरम्यान, भाजपमध्ये त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी खूप छळ केल्याचे खडसे यांनी स्वतः यापूर्वी सांगितले होते. आता खडसे यांनी आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. फाशी घेण्याची वेळ आली होती, इतकं भाजपमधल्या एका व्यक्तीने मला छळलं अशा शब्दात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी नाव न घेता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली.
यापुढे महाविकासआघाडी आणि राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार अशी गर्जनाही एकनाथ खडसेंनी केली. ते जळगावच्या मुक्ताईनगर येथे बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही जोरदार टीका केली आहे.
‘मला अक्कल शिकवायला चालले होते. मी अख्खं आयुष्य भारतीय जनता पार्टीला दिलं. माझा मुलगा गेला तरीही मी भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ राहिलो. पण मला एका माणसाने छेळलं.’ असं म्हणत खडसेंनी देवेंद्र फडवणीस यांना टोला लगावला आहे. मी भल्याभल्यांना मुख्यमंत्रीपद दान करत असतो. त्यामुळे असं समजा की उत्तर महाराष्ट्रात मुख्यमंत्रीचा दावेदार असलेलं हे पद मी ब्राह्मणाला दान म्हणून दिलं, असे बोलत खडसे यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.