देशात काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. तसेच महाराष्ट्रात सुद्धा पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे राज्य सरकार पाठोपाठ आता केंद्र सरकार सुद्धा सतर्क झाले आहे.
त्यात आता राज्यात वाढत असलेली कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेल्या राज्यांमध्ये केंद्र सरकार उच्च स्तरीय पथक पाठवणार आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांनी ७ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्रदेखील लिहिले आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना केंद्राकडून महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, गुजरात, पंजाब, मध्य प्रदेश आणि जम्मू-काश्मीरला करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलण्याचे आदेश देखील केंद्रीय आरोग्य सचिवांनी संबंधित राज्यांना दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार मागच्या २४ तासांत कोरोनाचे १३ हजार ७४२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ६ हजार २१८ रुग्ण फक्त महाराष्ट्रात आढळून आले आहेत. तर देशात कोरोनामुळे २४ तासात १०४ जणांचा मृत्यू झाला आहे.