पुण्यात भाडेतत्त्वावर सुरु होणार ई-बाईक्स; नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या प्रयत्नांना मोठे यश

महाराष्ट्र बुलेटिन : शहरामध्ये वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असल्याने ते कमी करण्यासाठी ई-वाहनांना चालना देणे आजमितीला काळाची गरज बनली आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिकेकडून आता पुणे शहरात ई-बाईक भाडेतत्त्वावर देण्यास मान्यता देण्यात आली आहे. ई-बाईक पुरविणाऱ्या दोन कंपन्यांना सदर बाईकच्या चार्जिंगसाठी शहरामध्ये जवळपास ५०० ठिकाणी रस्त्याच्या कडेला जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव देखील मंजूर करण्यात आला आहे.

तत्कालीन शहर सुधारणा समितीमध्ये अध्यक्ष अमोल बालवडकर यांनी पुढाकार घेऊन ई-बाईकचा प्रस्ताव मंजूर केला होता. मात्र, त्यानंतर हा विषय मुख्यसभेच्या मान्यतेसाठी जवळपास वर्षभरापासून पडून होता. दरम्यान सदरील प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने अमोल बालवडकर यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून पुणे शहरात ई-बाईक लवकरच आपल्याला सर्वत्र धावताना दिसतील आणि वायू प्रदूषणापासून होणारा धोका टाळण्यास मदत होईल.

सदर काम हे विट्रो मोटर्स प्रा. लि. आणि ई. मॅट्रिक्स माईल या कंपन्यांना देण्यात आले आहे. विट्रो मोटर्स प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून भाडेतत्त्वावर ई-बाईक पुरविणे व शहरात विविध ठिकाणी चार्जिंग स्टेशनसाठी व बाईक पार्किंगसाठी रस्त्याच्या कडेला जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव जून २०२० मध्ये यानंतर जुलै २०२० मध्येच स्थायी समितीने प्रशासनाकडून अभिप्राय घेतल्यानंतर सदर प्रस्ताव मंजूर करून सर्वसाधारण सभेकडे पाठवण्यात आला होता. दरम्यान डिसेंबर २०२० च्या कार्यपत्रिकेवर असलेल्या या प्रस्तावामध्ये महापालिकेकडे ई-बाईक्स पुरविण्याची तयारी दर्शविलेल्या ईमॅट्रीक्स माईल या कंपनीचाही समावेश होता.

दरम्यान या प्रस्तावाला नुकतीच मुख्यसभेत एकमताने मंजुरी मिळाली असून पुणे शहरातील सर्वसामान्यांना अतिशय स्वस्त दरात प्रवासासाठी ई-बाईक उपलब्ध होणार असून यामुळे खासगी वाहनांचा वापर कमी होऊन वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here