Skip to content Skip to footer

सिद्धेश कदम यांच्या पुढाकाराने युवासेनेतर्फे वृक्षारोपण; करणार १० हजार भारतीय प्रजातींची लागवड

महाराष्ट्र बुलेटिन : युवासेनेतर्फे पर्यावरणीयदृष्ट्या सजीव साखळीत महत्त्वाची भूमिका बजावणारे दुर्मिळ भारतीय प्रजातीचे सुमारे १० हजार वृक्ष उत्तर मुंबईमध्ये लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. सदर उपक्रमासाठी युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश कदम यांनी पुढाकार घेतला आहे. नुकतेच मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून या पर्यावरण पूरक उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे आपल्याकडे लवकर वाढ होणारी व आकाराने मोठी असणारी परदेशी निरुपयोगी झाडांची लागवड करण्याकडे अधिक भर दिला जातो. मात्र या वृक्षांना फळे येत नसल्याने किंवा फार कमी प्रमाणात येत असल्याने पशु-पक्ष्यांसाठी ते फारशी उपयोगी नसतात. तसेच काही झाडे जमिनीतील पाणी मोठ्या प्रमाणात शोषतात आणि पाण्याचा दर्जा देखील खालावण्याचं काम करतात.

मात्र युवासेनेतर्फे कैलासपती, पंखा, जारूळ या अतिशय दुर्मिळ झाडांसह वड, पिंपळ, आवळा, चिंच, जांभूळ अशी उपयोगी झाडे लावली जात आहेत. सदर उपक्रमाला महापौर किशोरी पेडणेकर, आमदार प्रकाश सुर्वे, नगरसेविका संजना घाडी, रिद्धी खुरसुंगे आदींच्या उपस्थितीत सुरुवात झाली आहे.

या उपक्रमादरम्यान महापौर यांनी मत मांडले की, सदरील वृक्षमोहीम आयोजित करून पर्यावरणीयदृष्ट्या मोलाचा संदेश देण्यात येत असून मुंबई प्रदूषणमुक्त राहण्यासाठी टाकलेले हे पाऊल अतिशय वाखाणण्याजोगे आहे. तसेच येत्या एक ते दोन महिन्यात वृक्षारोपण पूर्ण करण्यात येईल असे सिद्धेश कदम यांनी सांगितले.

Leave a comment

0.0/5