Skip to content Skip to footer

पाण्याची पातळी खालावल्याने पाणी पुरवठा विस्कळीत

पिंपरी रावेत बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराचा गुरुवारी (दि. 25) पाणी पुरवठा विस्कळीत असणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.

मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवडकरांना पाणी पुरवठा केला जातो. धरणातून नदीपात्रात पाणी सोडले जाते. रावेत येथील बंधाऱ्यातून महापालिका पाण्याचा उपासा करते. पाणी शुद्ध करुन शहरवासियांना पाणी पुरवठा केला जातो. रावेत बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे अशुद्ध जलउपसा केंद्रातील काही पंप बंद करावे लागले आहेत. यामुळे पाण्याचा उपसा कमी होत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराचा बुधवार व गुरुवारचा पाणी पुरवठा विस्कळीत राहणार आहे. पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी विभागाचे प्रयत्न सुरु आहेत. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

पुण्या पाठोपाठ पिंपरी-चिंचवड शहरात ही पाणी संकट येणार असून त्याची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. अपेक्षीत पाणी साठ्याच्या केवळ 8 टक्के पाणीसाठा पवना धरणात आहे. हा पाणीसाठा मे महिन्यापर्यंतच पिंपरी-चिंचवडकरांना पुरणार आहे. तर दुसऱ्या बाजूला पिंपरी-चिंचवड महापालिका ही मान्यतेपेक्षा 36 टक्के अधिक पाणी उचलत असून पिंपरी-चिंचवडकरांनी जपून पाणी वापरावे, असा सल्ला पाटबंधारे विभागाने दिला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांनाही आत्तापासूनच पाण्याची काटकसर करावी लागणार आहे.

Leave a comment

0.0/5