Skip to content Skip to footer

वर्दळीच्या मार्गांवर दर दर पाच ते सात मिनिटांनी बस..

पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात नव्या आठशे बस दीड वर्षात टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत. यामुळे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील वर्दळीच्या मार्गांवर प्रवाशांना दर पाच ते सात मिनिटांनी बस उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे.

अवश्य वाचा – आठशे बस गाड्या खरेदीला मंजुरी – तुकाराम मुंढे

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची व्याप्ती वाढवून दोन्ही शहरांतील नागरिकांना तिच्याशी जोडण्याचा “पीएमपी’चा उद्देश आहे.

नव्या बसगाड्यांची खरेदी प्रक्रिया राबविताना त्यासाठी नवे आगार, “टर्मिनस’, मार्गांचे सुसूत्रीकरण, स्वच्छतेची यंत्रणा इत्यादी पायाभूत सुविधाही उभारण्याचे नियोजन “पीएमपी’चे आहे. त्यामुळे रोजच्या प्रवाशांच्या संख्येचा आकडा नजीकच्या काळात 15 लाखांपर्यंत जाण्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे.

“पीएमपी’च्या ताफ्यात सध्या 2 हजार 55 बसगाड्या असून, त्यापैकी पुढील दीड वर्षात पावणेचारशे बसगाड्या “स्क्रॅप’ होणार आहेत. त्यात आता नव्या आठशे बसगाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावाला “पीएमपी’च्या संचालक मंडळाने मंजुरी दिली. त्या फेब्रुवारी 2019पर्यंत टप्प्याटप्प्याने उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे जवळपास अडीच हजार बसगाड्या रोज रस्त्यावर धावणार असून, बहुतांशी गर्दीच्या मार्गांवर सहा ते सात मिनिटांनी बसगाड्या धावणार आहेत.

पीएमपीमधून सध्या दररोज सुमारे अकरा ते साडेअकरा लाख प्रवासी प्रवास करतात. त्यातच पुढील महिनाभरात दोनशे “मिडी’ बस येणार असल्याने रोजच्या प्रवाशांची संख्या 15 लाखांच्या घरात असेल, असा दावा “पीएमपी’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी केला आहे.

पुरेशा बस आणि तत्पर सेवेमुळे खासगी वाहनांचा वापर करणारे प्रवासी पीएमपीकडे आकर्षित होतील. त्यादृष्टीने प्रवाशांना पायाभूत सुविधा पुरविण्यात येणार आहेत. नव्या “मोबाईल ऍप’मुळे त्याचा परिणाम जाणवत आहे. पुढील काळात अशा प्रकारे नवे बदल केले जातील, त्यामुळे जास्तीत जास्त प्रवासी “पीएमपी’ला पसंती देतील.

तुकाराम मुंढे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी 

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5