पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांना जिवे मारण्याची धमकी देणारी चार पत्रे आली आहेत. यातील काही पत्रात धमकी देणाऱ्याने भुजंगराव मोहीते या नावाने पत्र लिहिले आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मात्र तो अद्याप सापडत नाही. त्यामुळे मुंढे यांना धमकी देणारा हा भुजंगराव मोहीते कोण ? असा प्रश्न पडला आहे.
https://maharashtrabulletin.com/pmp-bus-tukaram-mundhe-pune/
चौथे पत्र मिळाल्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंढे यांना तातडीने शास्त्रधारी पोलिसांची सुरक्षा पुरविण्यात आली आहे. त्यांच्या कुटुंबियांनाही पोलीस संरक्षण पुरविण्यात येणार आहे. मुंढे यांना धमकीचे या महिन्यातील हे चौथे पत्र असून चारही पत्रातील अक्षर एकाच व्यक्तीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे यात पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीने “भुजंगराव मोहिते’ या नावाने पत्र लिहिले आहे. भुजंगराव मोहिते हे पुण्याचे पोलिस सहआयुक्त होते. अतिशय कडक व दक्ष अधिकारी म्हणून त्यांची ख्याती होती.
“मुक्तेश्वर प्रसन्न’ असे लिहून पत्राची सुरवात केली आहे. पत्रातील भाषा गलिच्छ आहे. मात्र उत्तम इंग्रजीचा वापरदेखील करण्यात आला आहे. पत्रात देण्यात आलेले पुण्यातील गुन्हेगारीचेजुने संदर्भ पाहता ही व्यक्ती बऱ्यापैकी वय असलेली असावी, असा अंदाज आहे. पुण्यात १९८० च्या दशकात गाजलेल्या विविध खून प्रकरणांचा संदर्भ या पत्रात देण्यात आला आहे.
दरम्यान, या पत्राची दखल घेत पोलीसांनी तपासाची गती वाढविली आहे. लवकरात लवकर हा आरोपी सापडला पाहिजे, अशा सूचना पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पोलीस आधिकाऱ्यांना दिल्या आहेत.