सामना प्रतिनिधी । पुणे – गेल्या काही वर्षांपासून वाढत्या लोकसंख्येप्रमाणे गुन्ह्यांचेही प्रमाण वाढत असल्याचे सांगितले जात होते. मात्र, २०१७ वर्ष पोलिसांसाठी ‘अच्छे दिन’ घेऊन आले आहे. या वर्षभरात पुण्यातील गुन्हेगारी तीन टक्क्यांनी घटली आहे. तडीपारी, मोक्का, स्थानबद्ध या प्रतिबंधात्मक कारवायांमुळे खून, खुनाचा प्रयत्न, दारोडा, घरफोडी, बलात्कार यांसह अन्य गुन्ह्यांचे प्रमाण घटल्याचा निष्कर्ष पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी काढला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे २०१७ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांसंदर्भात पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पत्रकार परिषद घेतली. सहआयुक्त रवींद्र कदम, अतिरिक्त आयुक्त रवींद्र सेनगावर, प्रदीप देशपांडे यावेळी उपस्थित होते.
२०१७ मध्ये पुण्यात १३ हजार ८८५ गुन्हे दाखल झाले असून, त्यांपैकी ८ हजार ९७१ गुन्हे उघडकीस आले आहेत. हे प्रमाण ६५ टक्के आहे. २०१६ मध्ये १४ हजार २८९ गुन्हे दाखल झाले होते. त्यांपैकी ९ हजार १९१ म्हणजे ६४ टक्के गुन्हे उघड झाले. २०१६च्या तुलनेत ४०४ गुन्हे कमी घडले असून, हे प्रमाण तीन टक्के आहे. २०१७ मध्ये १९ टोळ्यांच्या १२५ गुन्हेगारांवर मोक्काची कारवाई केली. २०१६ मध्ये १० टोळ्यांवर कारवाई करून ७७ जणांवर कारवाई केली होती. २०१७ मध्ये ३० गुन्हेगारांना कारागृहात स्थानबद्ध केले, तर २८० जणांना तडीपार केले. या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे पुणे शहरातील गुन्हेगारी कमी झाली आहे, असे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सांगितले. पुणे शहर महिलांसाठी सुरक्षीत आहे असे मानले जाते. २०१७ मध्ये ३४९ बलात्काराचे गुन्हे दाखल असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत २० गुन्हे कमी झाले आहेत. मात्र, विनयभंगाचे गुन्हे ६ टक्के वाढले आहेत. २०१७ मध्ये ६९९ गुन्हे दाखल झाले. २०१६मध्ये ६६२ गुन्हे दाखल झाले आहेत.
https://maharashtrabulletin.com/minister-girish-bapat/
वाहनचोरी वाढल्याची कबुली
प्रत्येक महिन्याच्या गुन्हे बैठकीत वाहनचोरी रोखण्याचे आदेश गुन्हे शाखा, पोलीस ठाण्यांना दिले जात होते. परंतु वाहनचोरी रोखण्यात पोलीस अयशस्वी ठरवले आहेत. २०१७ मध्ये ३ हजार १४९ गुन्हे दाखल असून, गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण केवळ ३० टक्के होते. वाहनचोरीचे गुन्हे घडण्याचे प्रमाण वाढले असून, ते उघडकीस येण्याचे प्रमाण कमी झाले आहे अशी कबुली रश्मी शुक्ला यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचा प्रस्ताव पाठविला
पिंपरी-चिंचवड येथे नवे पोलीस आयुक्तालय सुरू करण्यासंदर्भात राज्य शासनाला प्रस्ताव पाठविला आहे. हा निर्णय सरकार कधी घेईल यावर भाष्य करता येणार नाही
तांत्रिक अडचणीत अडकले सायबर पोलीस ठाणे
सायबर गुन्ह्यांचे प्रमाण गतीने वाढत असताना आता शिवाजीनगर मुख्यालय येथे प्रस्तावित असणारे स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे तांत्रिक कारणांमध्ये अडकल्याने ते कधी सुरू होणार हे स्पष्ट नाही. हे पोलीस ठाणे सुरू करण्यासाठी पोलीस महासंचालक कार्यालयाला पत्र पाठविले आहे. त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. सायबर गुन्हे घडू नये म्हणून आम्ही जनजागृती करत आहोत, असे रश्मी शुक्ला यांनी सांगितले.
२० कुंटणखाने सील
गेल्या वर्षभरात बुधवार पेठेतील २० कुंठणखाने सील केले आहेत. आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात या भागात कारवाई कधी केली नव्हती, शुक्ला यांनी सांगितले. बुधवार पेठेमध्ये अल्पवयीन मुलीकडून वेश्याव्यवसाय करून घेणे, मुलींना डांबून ठेवणे असे प्रकार लक्षात आले की त्यांच्यावर कारवाई केली जाते. दोन-तीन वर्षांपूवी पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या आधारावर हे कुंटणखाने सील केले आहेत.
सीसीटीव्हीवरून १०९ गुन्हे उघड
पुणे पोलिसांनी सीसीटीव्हीचा उपयोग करून १०९ गुन्हे उघडकीस आणले आहेत. १४० जणांना अटक केली आहे. यामध्ये घरफोडी, साखळीचोरी, गाडीचोरी, गाड्यांची तोडफोड अशा घटनांचा समावेश आहे. २०१६ मध्ये ६० गुन्हे उघडकीस येऊन ९३ जणांना अटक केली होती.
गुन्ह्यांसह शिक्षेचे प्रमाणही घटले
पुणे शहरातील गुन्हेगारी घटली असली तरी, गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाणही घटले आहेत. त्यामुळे अनेक गुन्हेगार मोकाट सुटले आहेत. २०१७ मध्ये ३ हजार ८३७ खटल्यांपैकी ११४२ गुन्ह्यात शिक्षा झाली, तर २६९५ प्रकरणांमध्ये गुन्हेगार सुटले आहेत. हे प्रमाण २९.७६ टक्के इतके आहे, तर २०१६ मध्ये हे प्रमाण ३६.३१ टक्के इतके होते. महाराष्ट्रात शिक्षा होण्याचे प्रमाण वाढत असताना, पुण्यातील प्रमाण घटले आहे.
‘बडीकॉप’मध्ये ८५ हजार महिला
नोकरदार महिलांच्या सुरक्षेसाठी सुरू केलेल्या ‘बडीकॉप’ उपक्रमांतर्गत ७१४ व्हॉट्सअॅप ग्रूप तयार केले असून, त्यात ८८२ कंपन्यांमधील ८५ हजार ४३१ महिलांचा समावेश आहे. त्यांच्याकडून आलेल्या तक्रारींची त्वरित दखल घेतली जाते; परंतु बहुतांश प्रकरणांमध्ये पोलिसांकडे तक्रार करून प्रकरण मिटविण्यावर भर आहे, असे रश्मी शुक्ला यांनी सांगितले. तर पोलीस काका उपक्रमांतर्गत १२२० शाळांमध्ये २१३ पोलीस काका नेमले आहेत. आतापर्यंत ११ तक्रारी आल्या असून, त्या सोडविल्या आहेत.
प्रमुख गुन्ह्यांची माहिती
गुन्हे दाखल उघड घट/वाढ
खून ११९ १०५ -२०
खुनाचा प्रयत्न १६३ १६२ -२९
दरोडा २६ २६ -१
जबरी चोरी ३९७ ३३८ -९२
चेनचोरी ९७ ८३ -५६
घरफोडी १००४ ५३६ -१२८
वाहनचोरी ३१६९ ९६३ ९६
फसवणूक ९६९ ७७० -२
बलात्कार ३४९ ३४६ -२०
विनयभंग ६९९ ६९३ ३७