Skip to content Skip to footer

पुण्यात ‘लॉकडाऊन’ होणार की नाही याविषयी विभागीय आयुक्तांनी दिली महत्वपूर्ण माहिती, जाणून घ्या

महाराष्ट्र बुलेटिन : कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात पोहोचले होते. विभागीय आयुक्त सौरभ राव आणि केंद्राच्या पथकातील सदस्यांसह झालेल्या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुण्यात लॉकडाऊन होणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच MPSC प्रकरणावर ते म्हणाले की, या प्रकरणामध्ये राजकारण करणं बरोबर नाही. राज्य लोकसेवा आयोग MPSC प्रकरण हाताळण्यास कुठेतरी कमी पडलं असं स्पष्ट मत देखील त्यांनी मांडलं.

अजित पवार यांनी यावेळी पुण्यातील तसेच संपूर्ण राज्यातील जनतेला कोरोना संकटाला गांभीर्याने घेण्याची विनंती केली. तसेच जास्तीत जास्त लसीकरण कसे करता येईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील असून केंद्राच्या आदेशाचं पालन करावं लागतं असंही त्यांनी स्पष्ट केलं. काही ठिकाणी नियमाचं अजिबातच पालन न झाल्याने नाईलाजाने काही कठोर निर्णय घ्यावे लागले असं देखील अजित पवारांनी स्पष्ट केलं. अजित पवारांनी घेतलेल्या बैठकीनंतर सौरभ राव यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, पुण्यात रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे, मात्र पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. कोरोनासंबंधित कोणतेही निर्बंध पुण्यात लागू केले जाणार नसल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान पुण्यातील शाळा, कॉलेज ३१ मार्चपर्यंत बंदच राहणार असल्याचे त्यांनी सांगितलं. मात्र यामध्ये १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना सूट देण्यात आली आहे. रात्री ११ ते ६ वाजेपर्यंत संचारबंदी असून अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडणाऱ्यांना परवानगी असणार आहे. त्याचप्रमाणे रेस्तराँ, हॉटेल ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवता येणार असून रात्री १० नंतर ते बंद राहतील. तसेच रात्री १० नंतर एका तासासाठी रेस्तराँ, हॉटेल यांना होम डिलिव्हरीची परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती आयुक्तांनी यावेळी दिली.

लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम, धार्मिक विधी, अंत्यविधी आणि दशक्रियाविधीसाठी केवळ ५० लोकांना परवानगी असणार आहे. जो कुणी नियमांचं उल्लंघन करेल त्याच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती देखील त्यांनी दिली. तसेच MPSC, UPSC च्या विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेता ग्रंथालय आणि कोचिंग क्लासेस ५० टक्के क्षमतेने सुरु राहू शकतात, तसेच चित्रपट, मॉल, हॉल्स रात्री १० नंतर बंद असणार आहेत. गार्डन देखील एकवेळच सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून ते केवळ सकाळी सुरु राहतील आणि संध्याकाळी बंद असणार आहेत.

Leave a comment

0.0/5