Skip to content Skip to footer

कॉंग्रेस मन मोठे करणार

नवी दिल्ली – लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अश्वमेध अडविण्यासाठी विरोधक पुन्हा सक्रीय झाले आहेत. कॉंग्रेस क्षेत्रीय पक्षांसोबत आघाडी करण्याचा प्रयत्न करीत आहे. सध्या महाराष्ट्रासह सात राज्यांतील 252 जागांवर महाआघाडी होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

कॉंग्रेसमधील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, लोकसभेच्या निवडणुकीत भाजपविरोधात महाआघाडीला आकार देण्याचे कार्य पुन्हा सुरू झाले आहे. देशभरातील क्षेत्रीय पक्षांच्या महत्वाकांक्षा आडव्या येणार असल्यामुळे आघाडी करताना कॉंग्रेसला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

2014च्या निवडणुकीत भाजपला ज्या राज्यांमध्ये जास्त यश मिळाले त्या राज्यांमध्ये आधी आघाडी अस्तित्वात आणण्याचे प्रयत्न आहेत. यात गोवा, पश्‍चिम बंगाल, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान आणि छत्तीसगड या सहा राज्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, बिहार, कर्नाटक, झारखंड, तामिळनाडू आणि जम्मू-काश्‍मीर या सात राज्यांमध्ये निवडणूकपूर्व आघाडी होण्याची शक्‍यता वाढली आहे. या सात राज्यांमध्ये 252 जागा आहेत. 2014च्या निवडणुकीत भाजपने यातील जवळपास दीडशे जागांवर विजय मिळविला होता. तर भाजपच्या सहकारी पक्षांनी डझनभर जागा याच राज्यांमध्ये जिंकल्या होत्या. भाजपविरोधी पक्ष एकजूट नसल्यामुळेही भाजपचा फायदा झाला होता.

तामिळनाडूमध्ये भाजपला फक्त एक जागा मिळाली होती. परंतु, 39 पैकी 37 जागांवर विजय मिळविणारा अण्णा द्रमुक पक्ष संसदेच्या आत आणि बाहेर भाजपचा सहकारी पक्ष म्हणून वावरताना दिसत आहे.

धर्मनिरपेक्ष पक्षांची निवडणूकपूर्व आघाडी
निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखांची घोषणा केल्यानंतरच महाआघाडीची घोषणा केली जाणार आहे. मात्र, महाआघाडीला बळकट करण्याचे काम भूमिगत पध्दतीने सुरू झाले आहे. 2004 मध्ये तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या विरोधात धर्मनिरपेक्ष पक्षांनी निवडणूकपूर्व आघाडी केली होती. आता नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सुध्दा हाच डाव मांडला जाणार आहे. महत्वाचे म्हणजे, क्षेत्रीय पक्षांना सोबत घेण्यासाठी मन मोठे करण्याची कॉंग्रेसने तयारी केली आहे.

Leave a comment

0.0/5