अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची, संभाजीराजांची भूमिका करता, पदोपदी त्यांचे नाव घेता आणि राजकीय फायद्यासाठी जातीचा वापर करता. तुम्हाला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत आमदार बाबुराव पाचर्णे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शिरूरचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यावर तोफ डागली आहे. शिवसेना-भाजप-रासप-आरपीआय महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ वाघोली येथे झालेल्या सभेत ते बोलत होते.
छत्रपती संभाजीराजांवरील मालिकेसाठी आपण स्वतःचे घर विकल्याचे खोटे सांगून शंभुप्रेमी तरुणांची सहानुभूती मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न करणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांचे पितळ उघडे पडले असून, एका वृत्त वाहिनीने त्यांचा खोटेपणा उघड केला आहे. अशा माणसाला छत्रपती शिवाजी महाराज व संभाजीराजांचे नाव घेत मतांचा जोगवा मागण्याचा अधिकार आहे का, असा सवाल पाचर्णे यांनी केला. लोकांना अभिनय करणाऱ्या अभिनेत्याची गरज नसून, आढळरावदादांसारख्या लोकनेत्याची गरज आहे. लोकसभेत वा राज्यसभेत गेलेल्या एकाही अभिनेत्याने तिथे कधी तोंड तरी उघडलंय का? लोकांना कधी ही नटमंडळी भेटल्याचं तरी आठवतंय का? अशा लोकांना संसदेत पाठवून मतदारसंघाचं वाटोळं करायचं का, असा सवाल आमदार पाचर्णे यांनी उपस्थितांना विचारला होता.