Skip to content Skip to footer

का दाखवत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वारगेटच्या जेधे चौकातील ट्रान्स्पोर्ट हब मध्ये रस…?

पुणे – स्वारगेटच्या जेधे चौकात ट्रान्स्पोर्ट हब बांधायला रस्तेविकास महामंडळापाठोपाठ आता महामेट्रोही उत्सुक आहे, तर एसटीलाही ‘आपली जागा’ बीओटी तत्त्वावर विकसित करायची आहे… एकाच चौकातील जागेवर तीन- तीन सरकारी यंत्रणांचा डोळा असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या कामात रस दाखवत उडी घेतली आहे आणि ट्रान्स्पोर्ट हबचे काम कोण करेल, ते मी ठरवीन, असे स्पष्ट केले आहे.

पिंपरी- स्वारगेट मेट्रो मार्गाचे काम सध्या सुरू असून, शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट दरम्यानच्या मार्गाचे जिओ टेक्‍निकल सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. महामेट्रोच्या वेळापत्रकानुसार जेधे चौकातील भुयारी स्थानकाच्या निविदा सप्टेंबर अखेरपर्यंत प्रसिद्ध होतील. त्यानंतर पुढील वर्षी जानेवारीमध्ये मेट्रो स्थानकाचे काम सुरू करायचे आहे. या स्थानकात पीएमपी, एसटी आणि रिक्षा यांनाही सामावून घ्यावे लागणार आहे. तत्पूर्वी हबसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे.

ट्रान्स्पोर्ट हब सार्वजनिक- खासगी भागीदारातून (पीपीपी) उभारण्याचा प्रस्ताव एमएसआरडीसीने यापूर्वीच तयार केला आहे. त्यातही मेट्रो स्थानकाचा अंतर्भाव आहे. या हबसाठी नेहरू स्टेडियमसमोरील विपश्‍यना केंद्रापासून शंकरशेठ रस्त्यावरील ढोले पाटील चौकापर्यंतच्या सुमारे २० एकर जमिनीचे भूसंपादन करावे लागणार आहे. त्यात एसटी महामंडळ, पीएमपी आणि महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या जागांचा समावेश आहे.

https://maharashtrabulletin.com/pune-metro-vanaz-ramwadi/

मात्र, महामेट्रोच्या आराखड्यानुसार जेधे चौकात सुमारे अडीच एकर जागेत भूमिगत मेट्रो स्थानक होणार आहे. त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. परिणामी महामेट्रोने भुयारी स्थानक केल्यास त्याला पीएमपी आणि एसटी महामंडळ जोडून घेतले जाऊ शकते. त्यासाठी महामेट्रोची पीएमपी आणि एसटी महामंडळाशी चर्चा आहे. तर, एसटी महामंडळालाही ‘बांधा- वापरा- हस्तांतरित करा’ तत्त्वावर एसटी स्थानकाचा पुनर्विकास करायचा आहे. त्यामुळे महामेट्रो, एसटी महामंडळ आणि एमएसआरडीसी यापैकी कोणती संस्था ट्रान्स्पोर्ट हब करणार, याबाबत सध्या चर्चा सुरू आहे.

महामेट्रोच्या माध्यमातून हब
पालकमंत्री गिरीश बापट यांनी याबाबत नुकतीच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. तसेच या हबच्या आराखड्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी गेल्या महिन्यातील नाशिक दौऱ्यात राज्यातील सर्वांत मोठे ट्रान्स्पोर्ट हब पुण्यात उभारणार असल्याचे जाहीर केले आहे. आमदार माधुरी मिसाळ यांनीही याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली. तेव्हा भुयारी मेट्रो स्थानकासह ट्रान्स्पोर्ट हब उभारण्याच्या विविध पर्यायांवर त्यांची चर्चा झाली. त्या वेळी महामेट्रोच्या माध्यमातूनही ट्रान्स्पोर्ट हब उभारता येईल, असेही त्यांनी सांगितल्याची माहिती मिसाळ यांनी दिली.

जागा देण्यास पालिकेचा नकार
जेधे चौकालगत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची चार एकर जागा आहे. त्यातील काही जागा विपश्‍यना केंद्रासाठी देण्यात आली आहे. या जागेवर महापालिकेला पाण्याच्या टाक्‍या बांधायच्या आहेत. त्यामुळे ही जागा हबसाठी देता येणार नाही, असे पत्र महापालिकेने नुकतचे महामेट्रो आणि एमएसआरडीसी यांना पाठविले आहे. त्यामुळे महामेट्रोची महापालिकेबरोबरही चर्चा सुरू आहे.

भुयारी मार्ग, सरकते जिने 
मेट्रो स्थानकालगतच भुयारी मार्गातून प्रवाशांना एसटी स्थानक आणि पीएमपी स्थानकात प्रवेश करता येणार आहे. त्यामुळे मेट्रोतून उतरलेल्या प्रवाशांना रस्ता न ओलांडताच एसटी किंवा पीएमपीच्या बसमध्ये पोचता येईल. त्यासाठी सरकते जिने, भुयारी मार्ग यांचा समावेश आहे. तसेच हब पीपीपी किंवा बीओटी पद्धतीने विकसित करण्यासाठी नव्याने आराखडा तयार करता येऊ शकतो. तसेच या विकसित होणाऱ्या हबमधून निर्माण होणाऱ्या मिळकती भाडेतत्त्वावर खासगी उद्योग- व्यावसायिकांना देता येणार आहे.

३०० कोटी रुपयांचा खर्च 
एकात्मिक बहुविध वाहतूक आराखड्यासाठी (इंटिग्रेटेड मल्टिमोड्यूल ट्रान्स्पोर्ट हब) किमान २५० ते ३०० कोटी रुपये खर्च येणार आहे. हा खर्च करण्याची क्षमता नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोणत्या संस्थेच्या माध्यमातून आणि कोणत्या आर्थिक तत्त्वावर ‘ट्रान्स्पोर्ट हब’ विकसित करायचे, याचा निर्णय येत्या महिनाभरात राज्य सरकार घेणार आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5