Skip to content Skip to footer

सीएनजी चे शहरात आणखी पाच पंप

पिंपरी – शहरातील वाहनांच्या सोयीसाठी येत्या वर्षअखेरपर्यंत महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) पाच नवीन पंप सुरू करण्याचे निश्‍चित केले आहे. हे पंप सुरू झाल्यानंतर सीएनजी पंपाची संख्या ३० पर्यंत जाऊन पोचणार असल्याचे एमएनजीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सकाळला सांगितले.  हिंजवडी, वाकड, पिंपरी, भोसरी, कासारवाडी या भागात हे पंप सुरू होणार आहेत.

सीएनजीवरील वाहनांची संख्या वाढत असल्यामुळे नवीन पंप सुरू करण्यास प्राधान्य देत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये सीएनजीचे ४० हजार ग्राहक आहेत. त्यामध्ये पीएमपीच्या बसचाही समावेश आहे. अनेक मोटारचालकांनी सीएनजीचे किट बसवून घेतले आहे, याखेरीज नवी मोटारी खरेदी करताना बहुतेकजण सीएनजी किट असणाऱ्या वाहनाला सर्वाधिक प्राधान्य देत आहेत. सीएनजी वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे शहरात पंपाची संख्या वाढवणे आवश्‍यक आहे. त्यादृष्टिने नियोजन करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने नमूद केले. सध्या शहरामध्ये सीएनजीचे २२ पंप कार्यरत आहेत. महिन्याभरात दोन नवे पंप सुरू होणार आहेत. एमएनजीएलकडून पुणे आणि पिंपरी-चिंचवडला दररोज चार लाख किलो सीएनजी गॅसचा पुरवठा करण्यात येतो. त्यापैकी पिंपरी-चिंचवडला दीड लाख किलो गॅसचा पुरवठा करण्यात येत आहे. नवीन पंप सुरू झाल्यानंतर त्यामध्ये आणखी भर पडणार असल्याचे या अधिकाऱ्याने नमूद केले.

https://maharashtrabulletin.com/pimpri-chinchwad-pune-smart-city-work-start/

…तर पंपाचा पुरवठा बंद
एमएनजीएलकडून पंपाना गॅसचा पुरवठा नियमितपणे करण्यात येतो. मात्र, पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील सहा पंपानी गॅसची रक्‍कम थकविली आहे. थकीत रक्‍कमेचा आकडा दिवसेंदिवस फुगत चालला आहे. त्यामुळे कंपनीला काम करणे अवघड होत आहे. त्यामुळे कंपनी प्रशासनाने पैसे न देणाऱ्या पंपाचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आठवड्यात हा पुरवठा बंद करण्यात येणार असल्याचे या अधिकाऱ्याने नमूद केले.

ग्राहकांची गैरसोय नाही
थकीत रक्‍कम न देणाऱ्या पंपाचा गॅसपुरवठा बंद करताना ग्राहकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्यात येणार असल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5