Skip to content Skip to footer

ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स राज्य हाती घेण्यासाठी होत आहेत सज्ज

राणी एलिझाबेथचे पुत्र प्रिन्स चार्ल्स यांचा सत्तरावा वाढदिवस नुकताच साजरा झाला. पण आता सत्तरी ओलांडत असलेल्या चार्ल्स यांचे आयुष्य पूर्वीपेक्षा अधिक व्यस्त झाल्याचे पहावयास मिळत आहे. याचे कारण असे, ९२ वर्षीय राणी एलीझाबेथ वयापरत्वे तिच्या राजकीय आणि सामाजिक जबाबदाऱ्या हळू हळू कमी करीत असून, या जबाबदाऱ्या आता प्रिन्स चार्ल्सनी उचललेल्या आहेत. त्याचबरोबर इतर मुख्य शाही सदस्यांनाही अनेक जबाबदाऱ्या देण्यात आल्या असल्याचे समजते. मुख्यतः परदेशभेटीवर जाणे राणीला आता शक्य नसल्यामुळे याही जबाबदाऱ्या इतर शाही सदस्यांना देण्यात आल्या आहेत.

गेल्या वर्षभरामध्ये शाही परिवाराला एकूण ३९०० औपचारिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावयाचे होते. त्यापैकी प्रिन्स चार्ल्स यांनी तब्बल ५०७ औपचारिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला असून, शाही परिवारातील सर्व सदस्यांमध्ये ते सर्वात व्यस्त असणारे सदस्य ठरले असल्याने ‘कोर्ट सर्क्युलर’ म्हणते. या सर्क्युलरमध्ये कोणत्या शाही सदस्याने वर्षभरामध्ये किती औपचारिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला याची सूची असते. त्याचप्रमाणे दहा देशांमध्ये राजकीय दौरे देखील प्रिन्स चार्ल्सनी गेल्या वर्षभरामध्ये केले आहेत. यावरूनच आता राणी एलिझाबेथ आपल्या सर्व जबाबदाऱ्या प्रिन्स चार्ल्सना सुपूर्त करीत असून, प्रिन्स चार्ल्स आता राज्य हाती घेण्यासाठी सिद्ध होत असल्याचे म्हटले जात आहे.

प्रिन्स चार्ल्स प्रमाणेच राणी एलिझाबेथचे नातू प्रिन्स विलियमच्या औपचारिक जबाबदाऱ्यांमध्ये वाढ झालेली पहायास मिळत आहे. २०१३ साली विलियमने केवळ ६२ औपचारिक कार्यक्रमांना हजेरी लावली होती. मात्र गेल्या वर्षी प्रिन्स विलियमने २२० औपचारिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला असल्याचे ‘कोर्ट सर्क्युलर’ म्हणते. त्याचप्रमाणे राणी एलिझाबेथची कन्या प्रिन्सेस अॅन, आणि राणीची इतर अपत्ये प्रिन्स अँड्र्यू आणि प्रिन्स एडवर्ड यांनी आता जास्त जबाबदाऱ्या स्वीकारल्या असल्याचे समजते.

Leave a comment

0.0/5