Skip to content Skip to footer

डेंगी चे 221 रुग्ण ऑगस्टमध्ये आढळले – पुणे महापालिका

पुणे – शहरात जुलैच्या तुलनेत या महिन्यात डेंगी च्या रुग्णांची संख्या चौपटीने वाढली आहे. जानेवारीपासून आतापर्यंत महापालिकेच्या हद्दीत डेंगीचे 307 रुग्ण आढळले असून, त्यापैकी 221 रुग्ण एकट्या ऑगस्टमधील असल्याची धक्‍कादायक माहिती पुढे आली आहे.

पावसाच्या साचलेल्या स्वच्छ पाण्यात मोठ्या प्रमाणात डासांची पैदास होत असल्याने त्यांच्यामार्फत पसरणाऱ्या डेंगी आणि चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहरातील 65 टक्के डेंगीचा संसर्ग सोसायट्यांच्या परिसरात साचलेल्या पाण्यात होणाऱ्या डासांच्या उत्पत्तीतून होत आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून मिळाली आहे. तसेच, रुग्णालये, महाविद्यालयांमध्येही डेंगीचे डास आढळले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने संकलित केलेल्या माहितीच्या विश्‍लेषणावरून शहरातील डेंगीच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचा निष्कर्ष निघाला आहे.

जुलैच्या तुलनेत चौपटीने वाढ; गेल्या आठ महिन्यांत 307 रुग्ण

शहरात जूनपासून पावसाला सुरवात झाली. पावसाचे स्वच्छ पाणी काचेचे तुकडे, टायर, बाटल्यांची झाकणे, नारळाच्या करवंट्यांमध्ये साचले. त्यात डेंगी पसरविणाऱ्या एडिस इजिप्ती डासांनी अंडी घातली. त्यातून नव्या डासांची पैदास झाली. त्याच वेळी घरातील फ्रिज, कुंड्या, फुलदाणी येथेही डेंगीच्या डासांच्या आळ्या आढळल्या. त्यामुळे डासांच्या उत्पत्तीस कारणीभूत ठरलेल्यांना महापालिकेच्या आरोग्य विभागाने नोटीस बजावण्यास आणि त्यांच्याकडून दंड वसूल करण्यास सुरवात केली आहे. आतापर्यंत चार हजारपेक्षा जास्त नोटीस दिल्या असल्याची माहितीही आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली.

https://maharashtrabulletin.com/women-get-more-infection-of-dengue/

याबाबत महापालिकेच्या कीटक-रोग विभागाच्या प्रमुख डॉ. कल्पना बळीवंत म्हणाल्या, ‘कीटक नियंत्रणाचा कार्यक्रम महापालिकेने हाती घेतला आहे. घरा-घरांत जाऊन डासांची पैदास तपासण्यात येत आहे. त्याच वेळी धूर फवारणी सुरू आहे. त्यामुळे लवकरच डासांचे नियंत्रण शक्‍य होईल. महापालिकेच्या या कार्यक्रमाला नागरिकांनीही सहकार्य केले पाहिजे. आपल्या सोसायटीच्या आवारात पावसाचे पाणी साचून, त्यात डासांची पैदास होणार नाही, याची काळजी घेणे आवश्‍यक आहे.”

शहरात आतापर्यंत डेंगीने दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात चार वर्षांच्या मुलाचा समावेश असून, एक महिलेचाही मृत्यू डेंगीने झाला आहे. तसेच, आतापर्यंत ऑगस्टमध्ये तीन रुग्णांचा डेंगीने मृत्यू झाल्याचा संशय आहे, असेही त्यांनी सांगितले.

‘शहरातील खासगी रुग्णालयांत निदान होणाऱ्या डेंगीच्या रुग्णांची माहितीदेखील महापालिकेला कळविण्याची सूचना डॉक्‍टर आणि रुग्णालयांना केली आहे. त्यामुळे रुग्ण आढळलेल्या भागात डास नियंत्रणाची मोहीम अधिक प्रभावीपणे राबविता येईल. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत असली तरीही त्यातून डेंगी नियंत्रण अधिक परिणामकारक करणे शक्‍य होणार आहे,”
– डॉ. कल्पना बळीवंत, कीटक-रोग विभागप्रमुख, पुणे महापालिका

असा वाढला डेंगी
महिना ……………. रुग्णसंख्या

जानेवारी ……………… 8
फेब्रुवारी ………………. 2
मार्च …………………… 4
एप्रिल ………………….. 5
मे ……………………… 3
जून …………………….. 6
जुलै …………………….. 58
30 ऑगस्ट ……………………. 221

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5