पुणे : पुण्यात गणेशोत्सवाच्या तोंडावर पुणे पोलिस ढोल-ताशा पथकांना नवीन नियमावली देणार असल्याची माहिती मिळत आहे. सध्या पुणे पोलिस ढोल-ताशा पथकांच्या नव्या नियमावलीबाबत विचार करत आहेत.
पुण्यातील गणेशोत्सव मिरवणुकीत ढोल ताशा पथकं मुख्य आकर्षण असतात. भाविकांची आवड लक्षात घेत गणेशोत्सव मंडळांनी पथकांची व त्यातील वादकांची संख्याही वाढवली. मात्र आता पुणे पोलिसांनी ढोल ताशा पथकांसाठी नवी नियमावली तयार केली असून येत्या दोन दिवसात यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
पोलिसांनी तयार केलेल्या नव्या नियमावलीनुसार, ढोल ताशा पथकांमध्ये वादकांची कमाल संख्या 52 असावी, अशी मर्यादा पोलिसांनी घातली आहे. याशिवाय मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीत तीन पेक्षा अधिका ढोल ताशा पथकांचा समावेश नसावा. तसेच अन्य मंडळांच्या मिरवणुकीत दोन पथकांनाच परवानगी देण्यात येणार आहे.
याशिवाय पोलिसांकडून गणेशोत्सवात शेवटचे पाच दिवस स्पीकरला रात्री 12पर्यंत परवानगी मिळण्याची शक्यता आहे. या नियमांवर पोलिसांचा सध्या विचार सुरू आहे.
गणेशोत्सव मिरवणुकीच्या ढोल-ताशा पथकांच्या या नियमांवर पोलिसांची चर्चा सुरू आहे. ढोलताशा पथक आणि पुणे पोलिस यांच्यात येत्या दोन दिवसांत बैठक होऊन अंतिम निर्णय घेऊन नवी नियमावली लवकरच ढोल-ताशा पथकांना दिली जाईल.