Skip to content Skip to footer

नरेंद्र मोदी स्टेडियमचे नामांतर मागे घ्या, भाजपा नेते सुब्रह्मण्यम स्वामींचा स्वपक्षीयांना सल्ला

अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमचे नामांतर नरेंद्र मोदी स्टेडियम केल्यानंतर वीरोधकांनी या निर्णयाला विरोध दर्शवला होता. तसेच सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली होती. त्यात आता भाजपाचे जेष्ठ नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी उडी घेत हे नामांतर मागे घ्यावे असे ट्विट करत घरचा आहेर दिला आहे.

मी गुजरातचा जावई असल्याने देशभरातील अनेक लोकांनी स्टेडियमचे सरदार पटेलांचे नाव हटविल्याबाबत विचारणा केली. मला असे वाटते की गुजरात सरकारने आपली अजून बदनामी करून घेऊ नये. या नामांतराबाबत पंतप्रधान मोदी यांना काहीच माहिती दिली नव्हती त्यामुळे हे नामांतर मागे घेतले पाहिजे, असे ट्विट करत गुजरात सरकारला टोला लगावला आहे.

सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमचे तीन दिवसांपूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नामांतर झाले. या सोहळ्याला गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. नामांतरानंतर भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्यावर सोशल मीडियातून प्रचंड टीका झाली. त्यानंतर स्वामी यांच्या ट्विटमुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे. हे स्टेडियम गृहमंत्री अमित शहा यांच्या मतदार संघात येत आहे

Leave a comment

0.0/5