नवी दिल्ली : चीनकडून होणारी डेटाचोरी रोखण्यासाठी केंद्र सरकारने नवा उपाय शोधला आहे. सर्व विदेशी मोबाईल कंपन्यांना त्यांचं एक सर्व्हर हे भारतात ठेवायला लागणार आहे. असा निर्णय सध्या सरकारच्या विचाराधीन आहे. कारण बहुतांश चिनी मोबाईल कंपन्यांचे सर्व्हर हे चीनमध्ये आहेत आणि तिथून ग्राहकांचा पर्सनल डेटाचोरी होत असल्याची माहिती समोर आली आहे.
शाओमी, ओप्पो, विवो, लेनोव्हो, जिओनी या सर्व चीनी मोबाईल कंपन्यां, ज्यांची भारतात 100 कोटीच्या आसपास गुंतवणूक आहे आणि त्यांचे सर्व सर्व्हर हे चीनमध्ये आहेत. तर शाओमी मोबाईल कंपनीचे चीनव्यतिरिक्त सिंगापूर आणि अमेरिकेतही सर्व्हर आहेत.
त्यामुळे आता भारत सरकारन डेटा चोरीवर हा नवा उपाय शोधला आहे. मात्र, या उपायामुळे भारतातील मोबाईल डेटा चोरी थांबण्यास आळा बसेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, भारतातील यूजर्सची वैयक्तिक माहिती थेट चीन सरकार चोरत असल्याची शंका आल्यानं मोदी सरकारनं याबाबत थेट चिनी कंपन्यांना नोटीस बजावली आहे.
भारतात विक्री होणारे बहुसंख्य स्मार्टफोन्स हे चिनी कंपन्याकडून तयार केले जातात. यामुळेच चीन सरकार भारतीयांची माहिती हॅक करण्याची भीती भारत सरकारला भेडसावत आहे.
काँटॅक्ट लिस्ट, एसएमएसच्या माध्यमातून ग्राहकांची वैयक्तिक माहिती चोरली जात असल्याचा संशय आहे. त्यामुळे ओप्पो, विवो, शाओमी, जियोनी यासारख्या चिनी मोबाईल कंपन्यांना सरकारने नोटीस बजावली आहे.
अधिक माहितीसाठी